Solar panel : कागदासारखे पातळ, प्रिंटेबल सोलर पॅनेल! | पुढारी

Solar panel : कागदासारखे पातळ, प्रिंटेबल सोलर पॅनेल!

सिडनी : सध्या स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जा म्हणून सौरऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. घरोघरी पाणी तापवण्यासाठीही सोलर पॅनेल (Solar panel) बसवलेले पाहायला मिळत आहेत. मात्र, आपण कधी एखाद्या वृत्तपत्राच्या कागदासारखे सोलर पॅनेल (Solar panel) पाहिले आहेत का? आता असे कागदासारखे पातळ आणि प्रिंटरच्या सहाय्याने प्रिंट केले जाणारे सोलर पॅनेल विकसित करण्यात आले आहेत. एखाद्या वृत्तपत्राच्या प्रिंटिंगप्रमाणेच असे अल्ट्रा थीन सोलर पॅनेल प्रिंट केले जातात. ऑस्ट्रेलियाच्या न्यूकॅसल युनिव्हर्सिटीने हे कागदासारखे पातळ व प्रिंटेबल सोलर पॅनेल विकसित केले आहेत.

न्यूकॅसल विद्यापीठाच्या संशोधकांनी हे प्रिंटेबल फोटोव्होल्टॅईक सोलर सेल्स तयार केले आहेत. हे सोलर पॅनेल अवघे 0.075 मिलीमीटर जाडीचे आहेत. हे सोलर पॅनेल्स विशेष प्रोपायटरी टेक्नॉलॉजीचा वापर करून बनवलेले आहेत. त्यासाठी ऑर्गेनिक पॉलिमर्सचा उपयोग करण्यात आला. ते सौरऊर्जा मिळवून वीजनिर्मिती करू शकतात.

पारंपरिक फोटोव्होल्टॅईक सोलर पॅनेल्सना (Solar panel) हे कार्य करण्यासाठी सिलिकॉनवर अवलंबून राहावे लागते व त्यांचे वजन बहुतांशी 15 किलो प्रति चौरस मीटर इतके असते. हे नवे ऑर्गेनिक पॉलिमर प्रिंटरच्या सहाय्याने प्रिंटही करता येऊ शकतात.

अगदी पुस्तके किंवा वृत्तपत्रांची छपाई करावी तशी छपाई अशा ऑर्गेनिक पॉलिमरचीही केली जाऊ शकते. न्यूकॅसल विद्यापीठातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक पॉल दस्तूर यांनी सांगितले की अशा प्रिंटेबल सोलर पॅनेल्सचा अनेक ठिकाणी चांगला उपयोग होऊ शकतो. त्यामध्ये रस्त्यावरील दिवे, वॉटर पंप, शरणार्थी शिबिर, कॅम्प आणि अगदी वाहनांना ऊर्जा देण्यासाठीच्या साधनांचाही समावेश होतो.

शिवाय त्यांची किंमत पारंपरिक पॅनेल्सच्या तुलनेत कमीही आहे. त्यांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात करता येऊ शकते. हे पॅनेल्स विविध पृष्ठभागांवर चिकटवताही येऊ शकतात. सध्या असे पॅनेल्स सिडनीमध्ये प्रदर्शनासाठी ठेवले असून ते विविधरंगी आणि आकर्षक स्वरूपाचे आहेत.

Back to top button