मिका बनली जगातील पहिली रोबो सीईओ | पुढारी

मिका बनली जगातील पहिली रोबो सीईओ

न्यूयॉर्क : आर्टििफिशियल इंटेलिजन्स (एआय) च्या सध्याच्या काळात प्रत्येक गोष्ट वैशिष्ट्यपूर्ण बनत आहे. ‘एआय’ रोबो आता मानवाची जागाही घेऊ लागले आहेत. अर्थात रोबो पूर्णपणे मानवाला पर्याय ठरतील याची शक्यता नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. मात्र आता एका कंपनीने आपल्या सीईओच्या जागीच एक रोबो बसवला आहे. या कंपनीने सीईओ म्हणून एका ‘एआय रोबो’ ची नियुक्ती केली आहे. हा रोबो स्त्री रूपातील असून तिचे नाव ‘मिका’ असे आहे. ती जगातील पहिली रोबो सीईओ ठरली आहे!

या कंपनीचे नाव ‘डिक्टेडोर’ असे आहे. कोलंबियातील या कंपनीने ‘मिका’ नावाच्या रोबोला सीईओ बनवून नवे पाऊल उचलले आहे. ‘हॅन्सन रोबोटिक्स’ आणि ‘डिक्टेडोर’ या दोन कंपन्यांच्या एकत्र मेहनतीचे फळ म्हणजे मिका. ‘हॅन्सन रोबोटिक्स’नेच ‘सोफिया’ या लोकप्रिय मानवाकृती रोबोची निर्मिती केली होती. ‘डिक्टेडोर’ने आपली सीईओ मिकाचा एक व्हिडीओ जारी केला आहे. त्यामध्ये ती म्हणत आहे, ‘एआय आणि मशिन लर्निंगच्या मदतीने मी अधिक चांगले आणि अचूक निर्णय घेऊ शकते.

माझ्यासाठी वीकेंडची सुट्टी वगैरे काही नाही. मी चोवीस तास काम करू शकते. मी पूर्वग्रहदूषितही नाही!’ अलीकडेच एका कार्यक्रमात मिकाने भाषणही केले होते. त्यामध्ये तिने म्हटले होते की ‘या मंचावरील माझी उपस्थिती पूर्णपणे प्रतीकात्मक आहे. मला मानद प्राध्यापकाची उपाधी देणे ही वास्तवात मानवी मेंदूलाच मानवंदना आहे. याच मानवी मेंदूत कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना निर्माण झाली होती. डिक्टेडोरच्या मालकांचे साहस आणि खुल्या विचाराचेही हे प्रतीक आहे ज्यांनी आपल्या कंपनीला हृदयाऐवजी प्रोसेसर असलेल्या विनम्र प्रवक्त्याला सुपूर्द केले. मिकाने आपण सध्याचे बेस्ट सीईओ एलन मस्क आणि मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्यापेक्षाही सरस असल्याचे म्हटले आहे!

Back to top button