Eye transplant : जगात प्रथमच संपूर्ण डोळ्याचे प्रत्यारोपण

Eye transplant : जगात प्रथमच संपूर्ण डोळ्याचे प्रत्यारोपण

न्यूयॉर्क : ही दुनिया आपण पाहतो डोळ्यांमुळेच. जर द़ृष्टीच अधू झाली किंवा गेली तर हे जग आपल्याला दिसू शकत नाही. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे द़ृष्टी कमजोर होत असते. आता यावर उपाय म्हणून जगात प्रथमच 'एंटायर आय ट्रान्सप्लान्ट' म्हणजेच संपूर्ण डोळ्याचे प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्यामध्ये डोळ्याचा केवळ एखादा भागच नव्हे तर सर्वच भागांचे प्रत्यारोपण करण्यात आले. अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली.

उतार वयात द़ृष्टी कमजोर होत असते. अनेक वेळा वस्तू धूसर, अस्पष्ट दिसू लागतात. त्याचे एक मोठे कारण मोतीबिंदूचे असते. ही समस्या शस्त्रक्रियेद्वारे सहज दूर करता येते. मात्र अपघातामुळेही अशा समस्या निर्माण होत असतात. त्यावेळी कॉर्निया ट्रान्सप्लांट केले जाते. त्यामध्ये काही ऊती काढून अंधत्वाची समस्या दूर केली जाते. मात्र अशी समस्या जन्मजात असेल तर त्याचा अर्थ ती आयबॉल म्हणजेच नेत्रगोलक किंवा बुब्बुळ, रक्तपुरवठा आणि ऑप्टिक नर्व्हशी संबंधित आहे.

'एंटायर आय ट्रान्सप्लांट' मध्ये बुब्बुळ, रक्तपुरवठा आणि मेंदूशी जोडलेल्या डोळ्यांच्या चेतातंतू (ऑप्टिक नर्व्ह) चे प्रत्यारोपण होते. आतापर्यंत संपूर्ण डोळ्याचे असे प्रत्यारोपण शक्य झाले नव्हते. मात्र न्यूयॉर्कच्या डॉक्टरांच्या टीमने ते यशस्वी करून दाखवले. एका दात्याच्या चेहर्‍याच्या काही भागासह त्याचा डावा डोळा काढण्यात आला ज्यामध्ये ब्लड सप्लाय टिश्यू, म्हणजेच रक्तपुरवठा करणार्‍या ऊतींसह ऑप्टिक नर्व्हही समाविष्ट होते. त्यांचे अराकान्समध्ये राहणार्‍या आरोन जेम्स या रुग्णामध्ये प्रत्यारोपण करण्यात आले. ही शस्त्रक्रिया करणार्‍या एडुऑर्डो रोड्रिग्वेज यांनी सांगितले की, वैद्यकीय विज्ञानासाठी हा मोठाच पल्ला गाठला गेला आहे.

यापूर्वी काही प्राण्यांमध्ये संपूर्ण डोळ्याचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. पण ते अंशतः यशस्वी झाले. आता मानवावरच अशी शस्त्रक्रिया झाली असून ती यशस्वी ठरली आहे. नेत्रतज्ज्ञ वैदेही डेडानिया यांनी सांगितले की, रक्तपुरवठा, रेटिनावरील दबाव यासह ऑप्टिक नर्व्हही योग्य प्रकारे काम करीत आहेत. अर्थात आताच जेम्स पाहू शकणार नाहीत. पण ते पाहू शकतील अशी आम्हाला आशा आहे. कोलोरॅडो युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका किया वॉशिंग्टन यांनी म्हटले आहे की, हे एक अनन्यसाधारण असे यश आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news