डिंकिनेश लघुग्रहाभोवती एक नव्हे जुळे चंद्र! | पुढारी

डिंकिनेश लघुग्रहाभोवती एक नव्हे जुळे चंद्र!

न्यूयॉर्क : ‘नासा’च्या ल्युसी मिशनमधून डिंकिनेश नावाच्या लघुग्रहाबाबत नवी माहिती समोर आली आहे. हे यान 1 नोव्हेंबरला लघुग्रहाजवळून गेल्यावर त्याच्याभोवती एक छोटा चंद्र फिरत असल्याचे आढळून आले होते. आता अन्य छायाचित्रांमधून आश्चर्यकारक वस्तुस्थिती समोर आली आहे. या लघुग्रहाभोवती एक नव्हे तर एकमेकाला खेटून असलेले दोन चंद्र फिरत असल्याचे स्पष्ट झाले.

‘डिंकिनेश’ हा मेन बेल्टमधील लघुग्रह असून त्याला कधी कधी ‘डिंकी’ असेही म्हटले जाते. हा लघुग्रह 790 मीटर व्यासाचा आहे. एखाद्या यानाने शोधलेला हा मेन बेल्टमधील सर्वात लहान आकाराचा लघुग्रह आहे. खगोलशास्त्रज्ञ 1999 पासून या लघुग्रहावर लक्ष ठेवत आहेत. त्याला एक चंद्रही आहे हे अनेक वर्षे माहिती नव्हते. आता तर त्याला एक नव्हे तर दोन चंद्र असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘ल्युसी’ यानाने टिपलेल्या छायाचित्रातून दिसते की, हे दोन्ही चंद्र एकत्रितपणे 220 मीटर आकाराचे आहेत. ज्यावेळी दोन अवकाशीय खगोल इतक्या जवळ येऊन एकत्रितपणे प्रदक्षिणा घालत असतील, तर त्यांना ‘काँटॅक्ट बायनरी’ असे संबोधले जाते, असे जुळे खगोल सौरमालिकेत नवे नाहीत. नेपच्यूनच्या कक्षेपलीकडे असलेल्या क्युपर बेल्टमधील ‘अरोकोघ’ हा बर्फाळ खगोल असाच ‘काँटॅक्ट बायनरी’ असल्याचे 2019 मध्ये स्पष्ट झाले होते. अन्यही काही लघुग्रह व धुमकेतुही असेच ‘बायनरी’ आहेत.

Back to top button