समुद्रतळाशी सापडली हजारो प्राचीन नाणी! | पुढारी

समुद्रतळाशी सापडली हजारो प्राचीन नाणी!

लंडन : जमिनीत किंवा समुद्रतळाशीही अनेक वेळा सोन्या-चांदीची किंवा अन्य धातूंची नाणी सापडत असतात. पाश्चात्त्य देशांमध्ये तर अनेक हौशी लोक मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने जमिनीत दडलेला असा खजिना शोधत असतात. आता एका व्यक्तीला इटलीच्या सार्डिनियापासून काही अंतरावर समुद्रात प्राचीन नाण्यांचा खजिना सापडला आहे. अर्थात ही नाणी सोन्या-चांदीची नसून ती ब्राँझची आहेत. मात्र त्यांची संख्या तीस ते पन्नास हजार इतकी आहे.

या व्यक्तीला सापडलेली ही नाणी अतिशय जुनी आहेत. ती चौथ्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. ही नाणी या व्यक्तीला भूमध्य सागरातील एका बेटाच्या तटापासून काही अंतरावर समुद्रतळाशी सापडली. मुळात त्यांची संख्या किती आहे हे नेमकेपणाने स्पष्ट झालेले नाही. सध्या त्यांची स्वच्छता आणि मोजणी सुरू आहे. या नाण्यांचे एकूण वजन पाहता ती तीस ते 50 हजार असावीत असा अंदाज आहे.

यापैकी बहुतांश नाणी अद्यापही सुस्थितीत असून काहीच खराब झाली आहेत. इटलीच्या सांस्कृतिक मंत्रालयाने म्हटले आहे की, या नाण्यांबाबतची माहिती संबंधित व्यक्तीने सरकारी अधिकार्‍यांनी दिली होती. त्यानुसार काही लोकांना पाठवून ही नाणी समुद्रातून बाहेर काढण्यात आली.

Back to top button