पठ्ठ्याने तंत्रज्ञानाद्वारे शोधली चोरी झालेली गाडी! | पुढारी

पठ्ठ्याने तंत्रज्ञानाद्वारे शोधली चोरी झालेली गाडी!

लंडन : गाडी चोरी होण्याचे प्रकार जगभर घडतात. अनेकदा या गाड्यांचा आणि त्या कोणी चोरल्या याचा छडाच लागत नाही. या पार्श्वभूमीवर, ब्रिटनमधील एका 23 वर्षीय इंजिनिअर तरुणाने गुगल अर्थ आणि स्नॅपचॅटच्या मदतीने आपली चोरी झालेली कार शोधून पोलिसांनाही चकित केले आहे. जेय रॉबिन्सन असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या दोन गाड्या चोरीला गेल्या होत्या. त्यानंतर त्याने तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली.

पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली अन् तपास सुरू केला. मात्र, दोन दिवस झाले तरी काहीच समोर आले नाही. यामुळे जेयने स्वत:च तपास सुरू करून दोन्ही गाड्यांची माहिती सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली. यानंतर त्याला त्याच्या जेमी नावाच्या मित्राचा त्याला फोन आला. तुझी गाडी मी पाहिली आहे, असे त्याने जेयला सांगितलं. पाठोपाठ स्नॅपचॅटच्या मदतीने संपर्क साधण्यात आला. मात्र, कार परत करण्यासाठी तब्बल 2000 पाऊंड किंमत मागितल्याने जेयला काय करावे तेच कळेना. यानंतर त्याने कारचा पत्ता शोधण्याचा निर्णय घेतला. गाडीचा फोटो नेमका कुठे काढलाय? याची माहिती जेयला हवी होती.

त्याने ‘रिव्हर्स इमेज सर्च’ची मदत घेतली. या माध्यमातून त्याला बाजूची इमारत दिसली. मात्र, ही जागा नक्की कुठे आहे? याचा पत्ता लागत नव्हता. त्याचवेळी त्याला एक कचर्‍याचा डबा दिसला. त्यावर जवळच्या हाऊसिंग सोसायटीचे नाव होते. गुगल अर्थच्या मदतीने सोसायटीचा पत्ता सापडला. जेयने पोलिसांना सोबत घेतले अन् चोराच्या मुसक्या आवळल्या. साहजिकच त्याला पहिली गाडी मिळाली. दुसरी गाडी त्याला अजून मिळाली नसली, तरी त्याचा तपास अजूनही सुरू आहे. माझ्याकडे असलेल्या चावीने ती गाडी लगेच अनलॉक झाली, तेव्हा माझी खात्री पटली की ती माझीच गाडी आहे, अशा भावना जेयने व्यक्त केल्या आहेत.

Back to top button