एव्हरेस्टच्या वजनापेक्षा अकरा पट अधिक धुळीने मारले डायनासोरना? | पुढारी

एव्हरेस्टच्या वजनापेक्षा अकरा पट अधिक धुळीने मारले डायनासोरना?

ब्रसेल्स : सुमारे 6 कोटी 60 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवरून डायनासोरचे साम्राज्य कसे नष्ट झाले याबाबत सतत नवे नवे संशोधन होत असते. आताही याबाबत बेल्जियमच्या रॉयल ऑब्झर्व्हेटरीच्या संशोधकांनी नवे संशोधन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार डायनासोर नष्ट होण्यामागे थेट लघुग्रहाचे कारण नव्हते. सुमारे 6 कोटी 60 लाख वर्षांपूर्वी निर्माण झालेला खडकांचा ढिगारा आणि प्रचंड धूळ यामुळे डायनासोर नष्ट झाले. ही धूळ माऊंट एव्हरेस्टच्या वजनापेक्षा अकरा पट अधिक होती!

एक मोठा शिळाखंड तुटल्याने व त्याची धूळ फैलावल्याने वातावरण अंधःकारमय झाले. त्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचू शकला नाही व वनस्पतींवर विपरित परिणाम होऊ लागला. या धुळीचे प्रमाण सुमारे 2 हजार गिगाटन होते. याचा अर्थ ही धूळ माऊंट एव्हरेस्टच्या वजनापेक्षा अकरा पट अधिक होती ज्यामुळे पृथ्वी आणि आकाश यांच्यामध्ये एक जाड पडदा निर्माण झाला. ही धूळ पंधरा वर्षे वातावरणात कायम होती. सूर्यप्रकाश अडवला गेल्याने जगभर न्यूक्लिअर विंटर निर्माण झाला. त्यामुळे अनेक झाडेझुडपे नष्ट झाली.

त्यांच्यावर अवलंबून असलेले अनेक शाकाहारी जीव व पर्यायाने शाकाहारी डायनासोरही मृत्युमुखी पडू लागले. या पंधरा वर्षांच्या काळात केवळ डायनासोरच नव्हे तर जिवंत प्राण्यांपैकी 75 टक्के प्राणी नष्ट झाले. 1978 मध्ये चिक्सुलब क्रेटरच्या शोधानंतर वैज्ञानिक डायनासोर लुप्त होण्याचे रहस्य उलगडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. एक मोठा लघुग्रह पृथ्वीला धडकल्यानंतर जीवसृष्टीचा मोठाच र्‍हास त्या काळात झाला होता. या धडकेमुळेच चिक्सुलब क्रेटर या विवराची निर्मिती झाली होती.

संबंधित बातम्या
Back to top button