दोन देशांमध्ये विभागलेले गाव | पुढारी

दोन देशांमध्ये विभागलेले गाव

कोहिमा : भारताच्या सीमेवर असे एक गाव आहे जे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत असते. हे गाव दोन देशांमध्ये विभागलेले आहे. या गावाचा प्रमुख भारतात जेवतो आणि म्यानमारमध्ये झोपतो! या गावातील अनेक लोक असंच करतात, बहुतांश लोक भारतात जेवतात आणि म्यानमरमध्ये झोपतात. हे गाव नागालँड राज्यात येतं, या गावाचं नाव लोंगवा असं आहे.

नागालँड राज्यातील मोन जिल्ह्यात लोंगवा नावाचे हे गाव आहे. हे गाव देशातील शेवटचं गाव म्हणून देखील ओळखलं जातं. निसर्गसौंदर्याने नटलेलं हे गाव अतिशय सुंदर आहे. अनेक पर्यटक लोंगवा या गावात फिरण्यासाठी येतात. हे गाव भारत आणि म्यानमारच्या सीमेमुळे दोन भागांत विभागलं गेलं आहे, यामुळेच लोंगवा गावातील रहिवाशांना दुहेरी नागरिकत्वाचा लाभ मिळतो. लोंगवा या गावातील नागरिकांना दोन्ही देशांमध्ये मुक्तपणे फिरण्याचं स्वातंत्र्य आहे. या गावातील बहुतेक घरांचा काही भाग हा भारतात आहे, तर काही भाग म्यानमार या देशात आहे.

लोंगवा या गावातील काही मुलं भारतातील शाळेत जातात, तर काही मुलं म्यानमारमधील शाळेत शिकतात. गावातील अनेक घरं दोन भागांत विभागली आहेत. अनेक घरांचे किचन भारतात आहे, तर बेडरूम म्यानमारमध्ये आहे. म्हणूनच येथील लोक जेवतात भारतात आणि झोपतात म्यानमारमध्ये, असे म्हटले जाते. गावाच्या प्रमुखासोबत देखील हीच स्थिती आहे. तो देखील जेवतो भारतात आणि झोपतो म्यानमारमध्ये. लोंगवा गावच्या नागरिकांना कोण्याक म्हणतात. कोण्याक ही भारतातील सर्वात दुर्मीळ आदिवासी जमात आहे.

राजा ‘आंग’ यांचं प्रतिनिधित्व करतो. कोण्याक लोक शत्रूच्या डोक्याच्या कवट्या गोळा करतात आणि त्या कवट्यांचा हार बनवून त्यांच्या गळ्यात घालतात. शत्रूला आपली ताकद दाखवण्यासाठी ते असा प्रकार करतात.जवळपास पाच हजार वस्तीच्या या गावातील 742 घरं ही भारतात आहेत आणि 224 घरं ही म्यानमारमध्ये आहेत. राजा आंग याचा राजमहल 100 वर्षांहून अधिक जुना आहे. या राजमहालाचा अर्धा भाग हा भारतात आहे, तर अर्धा भाग म्यानमारमध्ये आहे.

Back to top button