गेल्‍या ३ महिन्यांत पाळणाच हललेला नाही ‘या’ देशात निर्माण झाली माेठी समस्‍या | पुढारी

गेल्‍या ३ महिन्यांत पाळणाच हललेला नाही 'या' देशात निर्माण झाली माेठी समस्‍या

रोम : आपल्या देशात कुटुंब नियोजनावर भर दिला जात असताना तिकडे इटलीमध्ये वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. तेथे गेल्या तीन महिन्यांत एकाही मुलाचा जन्म झालेला नाही. त्यामुळे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी या प्रश्नाला राष्ट्रीय आपत्ती असे संबोधले आहे.

पर्यटकांचा स्वर्ग, खाद्यसंस्कृती, उच्च राहणीमान आणि अप्रतिम निसर्गसौंदर्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक इटलीला भेट देतात. मात्र, घटत चाललेल्या लोकसंख्येमुळे तेथील सरकार हैराण झाले आहे. मीडियम नावाच्या संकेतस्थाने दिलेल्या वृत्तानुसार, इटलीने नुकताच एक नवा विश्वविक्रम केला आहे. अर्थात त्यामुळे आनंद वाटण्यासारखे काहीही झालेले नाही. उलट, ही मोठी समस्या आहे. कारण, इटलीत जन्मदर घटला आहे.

नॅशनल स्टॅटिस्टिक्स ब्युरोच्या आकडेवारीचा हवाला देऊन प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, यामागील मुख्य कारण म्हणजे 15 ते 49 वयोगटांतील महिलांची कमतरता. म्हणजेच, इटलीमध्ये प्रजननक्षम वयाच्या महिलांची कमतरता भासू लागली आहे. त्यातून ही समस्या निर्माण झाली आहे. 2021 च्या तुलनेत 2023 मध्ये प्रजननक्षम महिलांची संख्या फार कमी झाली आहे.

इटलीवर ओढावलेली ही परिस्थिती इतक्या बिकट वळणावर पोहोचली आहे की, पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या समस्येकडे राष्ट्रीय आपत्ती म्हणून पाहत आहेत. मागील वर्षी आपल्या निवडणूक प्रचारामध्येही त्यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. इटलीमध्ये परिस्थिती इतकी भीषण आहे, की मागील वर्षभरात इथे दर 7 मुलांच्या जन्मामागे 12 जणांचा मृत्यू नोंदवण्यात आला.

सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास या देशात एका दिवशी सात मुलांचा जन्म होतो आणि दुसरीकडे 12 नागरिकांचा मृत्यूही होतो. हेच चक्र इटलीत असेच सुरू राहिले तर तेथील लोकसंख्या झपाट्याने कमी होईल. त्यामुळे सरकारही हतबल झाल्याचे दिसून येते.

Back to top button