World Stroke Day : स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठीचे उपाय… | पुढारी

World Stroke Day : स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठीचे उपाय...

नवी दिल्ली : जागतिक स्ट्रोक दिवस दरवर्षी 29 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना स्ट्रोकच्या धोक्यांची जाणीव करून देणे हा आहे. आपले आरोग्य आपल्या हातात आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही निरोगी जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी या दोन गोष्टींकडे लक्ष दिले, तर नक्कीच तुम्ही आजारांपासून दीर्घकाळ दूर राहू शकता, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

स्ट्रोकचा आपल्या जीवनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो, म्हणून ते समजून घेणे आणि ते कसे टाळता येईल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जागतिक स्ट्रोक दिनानिमित्त, आपण त्याच्या प्रतिबंधाचे बारकावे समजून घेऊया, जेणेकरून आपण या सायलेंट किलरपासून सुरक्षित राहू शकाल. स्ट्रोक कोणालाही प्रभावित करू शकतो, मग तो तरुण असो वा वृद्ध. उच्च रक्तदाब, धूम्रपान, मधुमेह, लठ्ठपणा आणि जास्त मद्यपान यांमुळे स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. जेव्हा मेंदूमध्ये रक्ताची गुठळी होते, रक्तवाहिन्या फुटतात आणि रक्तस्त्राव सुरू होतो किंवा मेंदूला योग्यरीत्या रक्तपुरवठा होत नाही, तेव्हा स्ट्रोक होतो. स्ट्रोक टाळण्यासाठी पहिली पायरी म्हणजे जीवनशैलीत बदल. ज्यामध्ये सकस आहार खूप महत्त्वाचा आहे.

आहारात फळे, भाज्या आणि अखंड धान्य समाविष्ट करावे. दररोज काही वेळ जॉगिंग, चालणे किंवा पोहणे यासारख्या शारीरिक हालचाली कराव्यात, यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये घट्ट संबंध आहे, त्यामुळे योगासने, व्यायामाबरोबरच ध्यान आणि प्राणायामही करावे. यामुळे तणाव दूर होतो आणि मन शांत राहते. स्ट्रोक विरुद्धच्या लढ्यात त्याची लक्षणे वेळेवर ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

चेहरा झुकणे, हात कमजोर होणे, बोलण्यात अडचण ही काही लक्षणे आहेत. नियमित आरोग्य तपासणी करून स्ट्रोकचा धोकाही कमी केला जाऊ शकतो. नियमित आरोग्य तपासणीमुळे आपल्याला कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर, रक्तदाब इत्यादी गोष्टींची माहिती मिळते. जेणेकरून जर काही चढउतार असतील, तर आवश्यक वैद्यकीय सहाय्याने ते बरे करता येईल. धूम्रपान करणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. यामुळे कॅन्सरचा धोका तर वाढतोच; पण ब्रेन स्ट्रोकचा धोकाही वाढतो. कारण त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते.

Back to top button