

नवी दिल्ली : अनेकांना वारंवार हातांना आणि पायांना मुंग्या येतात. इतकंच नाही तर काही वेळ उभे राहिल्यानंतर बोटांमध्ये मुंग्या यायला सुरुवात होते. जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे विशेषतः 'व्हिटॅमिन बी 12' च्या कमतरतेने ही समस्या निर्माण होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे न्यूरॉन्सच्या क्रियाकलापांवर परिणाम होतो तसेच मज्जातंतूंच्या कार्यपद्धतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो.
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे अनेक प्रकारांच्या न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवतात. उदाहरणार्थ, पायांमध्ये पॅरेस्थेसिया, स्नायूंना क्रॅम्प येणे, चक्कर येणे, गोंधळणे, थकवा आणि नैराश्य यांसारख्या समस्या दिसतात. त्याचं सर्वात मोठं कार्य मज्जातंतूला जोडणे आहे. यामुळे, स्नायू कमकुवत होऊ शकतात आणि नसांची शक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे नसांमध्ये मुंग्या येऊ लागतात. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करायची असेल, तर त्यासाठी आहारात काही पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे.
आहारात मांस, मासे, दूध, चीज, मशरूम, फळे आणि अंडी यांचा समावेश करणे गरजेचे आहे. याबरोबरच धान्याची भरडही तुम्ही खाऊ शकता. अल्कोहोल, कॉफी, प्रक्रिया केलेले अन्न यांचं सेवन टाळावे. अनेक अहवालांमध्ये हेदेखील समोर आले आहे की, हात आणि पायांना मुंग्या येण्याचे कारण केवळ व्हिटॅमिन बी 12 नाही तर इतर अनेक जीवनसत्त्वांचा अभाव आहे. मात्र, काही लोकांना योग्य आहार मिळत नाही, म्हणून जीवनसत्त्वाची कमतरता भासते.