

प्योंगयांग : एखाद्या देशाचा कारभार हुकूमशहाच्या हातात असेल तर तेथील जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. हुकूमशहाची लहर, त्याने काढलेले विचित्र आदेश व ते न पाळल्यास होणारी कठोर शिक्षा यांचा सामना लोकांना करावा लागत असतो. हीच स्थिती उत्तर कोरियामध्ये आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन जनतेवर अनेक विचित्र नियम आणि कायदे लादतो. आता पुन्हा एकदा उत्तर कोरियामधील विचित्र नियम चर्चेत आहे. उत्तर कोरियामध्ये सरकारने नागरिकांना मलमूत्र जमा करण्याचा विचित्र आदेश दिला आहे. त्यामुळे येथील लोक कमोड फ्लश करायलाही घाबरत आहेत!
उत्तर कोरियामध्ये किम जोंग उनची हुकूमशाही चालते, त्यामुळे तो नागरिकांना हवा तसा काही आदेश देत ते करण्यास भाग पाडतो आणि तसं न करणार्या अगदी मृत्यूदंडासारखी कठोर शिक्षाही देतो. आता किम जोंग उनने खताचा तुटवडा भरून काढण्यासाठी विष्ठा जमा करण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर कोरियामध्ये काही वर्षांपूर्वी खताचा तुटवडा सुरू झाला होता. देश सातत्याने खताच्या टंचाईशी झगडत होता. यानंतर हा तुटवडा भरून काढण्यासाठी हुकूमशाह किमच्या सरकारने विचित्र नियम लादला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, किम जोंग उन यांनी लोकांना त्यांचे मलमूत्र जमा करण्यास सांगितले आहे. इतकंच नाही जर त्यांनी तसे केले नाही, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्यांच्यावर दंड आकारण्यासही सांगण्यात आलं आहे. उत्तर कोरियामध्ये विचित्र फर्मान जारी करत लोकांना पहिल्या 6 महिन्यांत 100 किलो विष्ठा गोळा करण्यास सांगितलं होतं. यानंतर खताचा तुटवडा दूर होईल, असं किम जोंगच्या सरकारला वाटलं. पण, तरीही खताचा तुटवडा कायम होता, काही दिवसांनी खताच्या तुटवड्यामुळे तीव्र संकट निर्माण झालं, त्यामुळे सरकारने 100 किलो ऐवजी तो 200 किलोपर्यंत मलमूत्र जमा करण्याचा आदेश देण्यात आला.
उत्तर कोरियामध्ये सर्व नागरिकांना असे करण्याचे निर्देश देण्यात आले होते. याशिवाय काही कंपन्यांना याबाबत सूचनाही देण्यात आल्या होत्या. कोरोना महामारीनंतर हा ट्रेंड दिसून आला. मात्र, सध्या लोकांना किती किलो विष्ठा जमा करावी लागणार आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. उत्तर कोरियामध्ये गरिबीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनानंतर येथे पिके कमी प्रमाणात येऊ लागली आणि अन्नाचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे येथे अनेक लोक उपासमारीचे बळी ठरले. या देशातील लोकांचे सरासरी उत्पन्नदेखील खूप कमी आहे, त्यावर हुकूमशाह किम जोंग उन नागरिकांवर विचित्र कठोर कायदे करत असल्यामुळे तेथील जनतेचं जीवन जगणं दिवसेंदिवस कठीण होत आहे.