कचर्‍यात एक अब्ज टाकणारी पराक्रमी महिला! | पुढारी

कचर्‍यात एक अब्ज टाकणारी पराक्रमी महिला!

कॅलिफोर्निया : मनुष्याला नशिबापेक्षा जास्त आणि नशिबापेक्षा कमी काहीही मिळत नाही, असे का म्हणतात, त्याची प्रचिती अमेरिकेतील एका ज्येष्ठ महिलेला आली. या महिलेने चक्क 1 अब्ज रुपयांची लॉटरी जिंकली होती; पण रुसलेले नशीब आड आले आणि या महिलेला ते लॉटरीचे तिकीट कचराकुंडीत टाकण्याची दुर्बुद्धी सुचली. 77 वर्षीय जेनेट बेनेंटी असे या महिलेचे नाव असून, तिने 30 वर्षांपूर्वीचा हा किस्सा आता सांगितला आहे.

जेनेट बेनेंटीने 30 वर्षांपूर्वी लॉटरीची बरीच तिकिटे खरेदी केली होती. ज्यावेळी या तिकिटांचा ड्रॉ होणार होता, त्यावेळी तिला आपल्या मित्राच्या घरी जायचे होते. या गडबडीत तिने तिकिटांचा निकाल पाहिलाच नाही आणि तिकीट लागलेच नाही, असे समजून तिने सर्व तिकिटे डस्टबिनमध्ये टाकून दिली. ज्यावेळी तिच्या मित्रांनी तिला लॉटरीचा ड्रॉ पाहण्याची आठवण करून दिली, तोवर खूपच उशीर झाला होता आणि सर्व तिकिटे कचराकुंडीतून बाहेर नेली गेली होती. वास्तविक, जेनेटला त्यावेळी पैशांची नितांत गरज होती. तिच्या पतीचे निधन झाले होते आणि ती सिंगल मदर होती. लॉटरीचे तिकीट असे फेकून दिल्यानंतर तिला बराच पश्चात्ताप झाला व तिला नैराश्यानेही ग्रासले; पण नंतर यातून मार्ग काढण्याशिवाय पर्याय नाही, याची जाणीव झाल्यानंतर ती हळूहळू यातून बाहेर पडली. आता ती स्थिरस्थावर आहे; पण, कधीकाळी आपण एक अब्ज रुपये कचर्‍यात टाकले, याची खंत आजही जाणवत असल्याचे ती सांगते.

Back to top button