वाळवंटामधूनही दिसणार समुद्राचा नजारा! | पुढारी

वाळवंटामधूनही दिसणार समुद्राचा नजारा!

न्यूयॉर्क : अनेकदा असे होते की, आपल्याला वाटते घरबसल्या निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण न्याहाळता यावी. अशा परिस्थितीत आपण अनेकदा टी.व्ही. किंवा मोबाईलशी जोडले जातो; पण घरबसल्याच आपल्या खिडकीतून असे नजारे पाहायला मिळाले, तर यापेक्षा खास काही असू शकणार नाही. प्रत्यक्षात ही एकवेळ कवी कल्पना वाटेल; पण एक मॅजिकल विंडो ऑफर अशीही आली आहे, ज्यामुळे जादूप्रमाणे आपण काहीही पाहू शकतो.

या खिडकीची खासियत अशी आहे की, यासाठी आपल्याला फारशी काही मेहनत करावी लागणार नाही; पण तंत्रज्ञानावर विश्वास ठेवावा लागेल. ही हाय रिझॉल्युशन डिजिटल खिडकी लिक्विड व्ह्यूतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही डिजिटल खिडकी आपल्या पारंपरिक खिडक्यांपेक्षा बरीच वेगळी आहे आणि आपल्याला हवा तो व्ह्यू यामुळे काही सेकंदात मिळू शकतो.

अमेरिकन कंपनी लिक्विड व्ह्यूजला आपल्या हाय रिझॉल्युशन डिजिटल पॅनेल्ससाठी खास ओळखले जाते. ही कंपनी अशा खिडक्या तयार करत आहे, जे कुठेही अगदी सहजपणे मिसळून जाऊ शकतात. अगदी सर्वसाधारण खिडकीवरदेखील ही खिडकी लावली जाऊ शकते. या व्हर्च्युअल विंडोच्या माध्यमातून सबस्क्रिप्शन बेस्ड कंटेट लायब—रीदेखील उपलब्ध आहे. याचा अर्थ असा की, आपण पैसे देऊन जगातील कोणतीही जागा आपल्या खिडकीवर व्हर्च्युअल फॉर्मवर मिळवू शकतो. स्मार्टफोन अ‍ॅपच्या माध्यमातूनही त्याला अ‍ॅक्सेस केले जाऊ शकते. विंडो लायब—री स्थानिक प्रमाणवेळेशी जुळवून घेऊ शकते आणि यामुळे त्या जागेवरील अनुभव आपल्याला घरबसल्या मिळू शकतो. या व्हर्च्युअल विंडोमध्ये असणारा प्रत्येक व्ह्यू नॅशनल जिओग्राफीक स्तरावरील सिनेमेटोग्राफर्स फीचर फिल्म मोशन पिक्चरच्या कॅमेर्‍याशी सेट केले गेले आहे. 24 तासांच्या कालावधीत येथे 8 हजारांपेक्षा अधिक व्हिडीओ चालतात. प्रत्येक विंडोसह ट्रिम रेडी इन्स्टॉलेशन किट असते. सिंगल पॅनेल व्हर्च्युअल विंडोची किंमत मात्र अव्वाच्या सव्वा असून, या एका विंडोसाठी थोडेथोडके नव्हे, तर 20 लाख ते 95 लाख रुपये मोजावे लागतात.

Back to top button