असाही जीव, ज्याच्यासाठी पाणी म्हणजे विष! | पुढारी

असाही जीव, ज्याच्यासाठी पाणी म्हणजे विष!

लॉस एंजलिस : ‘पाणी हेच जीवन,’ असे म्हटले तर ते अजिबात गैर ठरत नाही. पाण्याशिवाय जसा मनुष्य राहू शकत नाही, तसे जीवजंतू, प्राणीही राहू शकत नाहीत. आता आश्चर्य वाटेल; पण एक जीव असाही आहे, जो कधीच पाणी पीत नाही आणि तरीही अगदी वाळवंटात जिवंत राहतो! यापुढेही आणखी आश्चर्य म्हणजे, ज्या दिवशी हा जीव जल प्राशन करेल, तो कदाचित त्याचा शेवटचाच दिवस!

हा जीव उंदराची एक प्रजाती आहे, जो पाण्याशिवाय आयुष्य काढू शकतो. उत्तर अमेरिकेच्या वाळवंटात ही प्रजाती आढळून येते. याला कांगारू उंदीर या नावाने ओळखले जाते. हा जगभरातील एकमेव जीव असावा, जो पाण्याशिवाय जिवंत राहू शकतो. या प्रजातीच्या उंदराचे पाय व शेपूट कांगारूंप्रमाणे असते आणि याचमुळे त्याला कांगारू उंदीर, असे संबोधले जाते. या प्रजातीतील उंदराच्या गालाबाहेर अशीच पिशवी असते, जशी कांगारूंना असते. अगदी दिसण्यातदेखील हा छोट्या कांगारूसारखाच आहे. इतकेच नव्हे, त्याच्या उड्यादेखील कांगारूंप्रमाणेच असतात. केवळ एका सेकंदात सहा मीटर अंतर पार करण्याची या उंदराची क्षमता असते.

कांगारू उंदीर वाळवंटातच राहतो. आयुष्यभर हा जीव पाण्याला स्पर्शही करत नाही; पण त्याच्या शरीरात मात्र मोठ्या प्रमाणात पाणी आढळून येते. या उंदराच्या शरीरात इतके पाणी असते की, अन्य जीव त्याला मारून खातात आणि आपली तहान भागवतात. या प्रजातीतील उंदराचे पाय व डोळे छोटे, तर डोके मोठे असते. हा उंदीर मुख्यत्वेकरून कॅक्टस, झाडारोपांची मुळे व कधी कधी छोटे छोटे किडे खाऊन राहतो. या जीवाची रचनाच अशी आहे की, त्याला पाण्याची आवश्यकताच भासत नाही. संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की, हे उंदीर बियांपासून मिळणार्‍या मेटोबोलाईज्ड पाण्यावर जिवंत राहतात.

Back to top button