ब्रिटनमध्ये 500 कोटींचा रिंगरूट बनला ‘घोस्ट जंक्शन’! | पुढारी

ब्रिटनमध्ये 500 कोटींचा रिंगरूट बनला ‘घोस्ट जंक्शन’!

लंडन : चीनमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून बनवलेल्या वसाहती, उंच अपार्टमेंट लोकांशिवाय ओसाड, निर्जन पडलेल्या आहेत. त्यामागे अनेक कारणे आहेत. ब्रिटनमधीलही एक रिंगरूट सध्या ‘घोस्ट जंक्शन’ म्हणजेच भुताचा वावर असलेलं निर्जन ठिकाण म्हणून (कृ)प्रसिद्ध झाले आहे. आता मात्र भुताचा वावर असल्याची चर्चा असलेला हा मोटरवे ‘एम 49’ लवकरच सुरू होणार आहे. विशेष म्हणजे हा अंडाकृती आकाराचा मार्ग असून तो एलिव्हेटेड म्हणजेच जमिनीपासून उंचावर बांधण्यात आला आहे. हा एलिव्हेटेड मार्ग तयार करण्यासाठी 50 मिलियन पाऊंड स्ट्रेलिंग म्हणजेच भारतीय चलनानुसार 500 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. सध्या या रिंगरूटची जगभरात चर्चा आहे.

‘एम 49’ मार्गावरून अजून एकाही कार गेलेली नाही. हा मार्ग बांधून 3 वर्षे उलटून गेल्यानंतरही तो वापरासाठी सुरू करण्यात आलेला नाही. हा मार्ग ब्रिटनमधील ग्लॉस्टरशायर शहरामधील एवनमाऊथजवळ सन 2019 मध्ये बांधण्यात आला. तो ब्रिस्टलजवळच्या सेवर्न आणि चिटरिंग या दोन शहरांना जोडतो. एवढा खर्च करून उभारण्यात आलेला हा एलिव्हेटेड मार्ग मागील 3 वर्षांपासून बंदच आहे. मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करूनही या मार्गाचा वापर अद्याप एकाही कारने केलेले नाही.

हा मार्ग ज्या हायवेवर बांधण्यात आला आहे त्याला लागून असलेले लिंक रोड तसेच समांतर रोड उपलब्ध नव्हते. त्यामुळेच चालकांना सेवर्नसाईड इंडस्ट्रियल इस्टेट, अ‍ॅमेझॉन गोदामे, टेस्को आणि लिडल यासारख्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मोठा फेरा मारून यावे लागत असे. त्यावर उपाय म्हणून हा हवेतील पुलासारखा रिंगरूट पद्धतीचा एलिव्हेटेड मार्ग बांधण्यात आला; पण तो अद्याप वापरण्यात आलेला नाही. हा मार्ग आता ‘घोस्ट जंक्शन’ म्हणूनच स्थानिकांमध्ये ओळखला जातो. आता हाच मार्ग सुरू करण्याची चर्चा स्थानिक पातळीवर होत असल्याचे दिसत आहे.

साऊथ ग्लॉस्टरशायर कौन्सिलने दिलेल्या माहितीनुसार 160 मीटर लांबीचा हा मार्ग सुरू करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे निवेदन पाठवण्यात आले आहे. या निवेदनाची दखल घेतली तरी हा मार्ग सुरू होऊ शकतो. बांधून पूर्ण असतानाही या ठिकाणावरून कोणी येत- जात नसल्याने या मार्गावर भुतांचा वावर असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर दबक्या आवाजात होत असते. त्यावरूनच हे नाव पडलं आहे!

Back to top button