झिका चा धोका वाढतोय! | पुढारी

झिका चा धोका वाढतोय!

नवी दिल्‍ली : डासांमुळे फैलावणार्‍या आजारांमध्ये मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनियाप्रमाणेच झिका व्हायरसच्या आजाराचाही समावेश होतो. डेंग्यूचा कहर अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. आता उत्तर प्रदेशात झिका विषाणूचा कहर पाहायला मिळत आहे.

उत्तर प्रदेशात 16 ऑक्टोबरला झिकाचा पहिला रुग्ण आढळला आणि त्यानंतर राज्यात आतापर्यंत 107 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 106 रुग्ण एकट्या कानपूर जिल्ह्यातीलच आहेत. या विषाणूबाबत आणि त्याच्या आजाराबाबत आता जनजागृती होणे गरजेचे बनले आहे.

झिका विषाणूचा संसर्ग झाल्यावर ताप येणे, अंगदुखी, डोळे येणे, अंगावर पुरळ येणे, सांधेदुखी अशा समस्या निर्माण होतात. झिका विषाणूचा फैलाव करणारा डास चावल्यानंतर आठवड्याभरात झिकाची लक्षणे दिसून येऊ लागतात. झिकाच्या संसर्गानंतर गुलेरियन बॅरी सिंड्रोम या एका गंभीर ऑटोइम्यून डिसऑर्डरचाही धोका निर्माण होऊ शकतो. जर गर्भवती महिलेस या आजाराची लागण झाली तर जन्माला येणार्‍या बाळाच्या कवटीचा भाग कमी होऊ शकतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार युगांडाच्या जंगलात 1947 मध्ये सर्वप्रथम हा विषाणू सापडला. त्यावेळी माकडांमधून माणसांना या विषाणूचा संसर्ग झाला होता. ‘एडिज’ या दिवसाच्या वेळी दंश करणार्‍या डासांमुळे हा विषाणू फैलावतो.

दूषित रक्‍तामुळेही या विषाणूची लागण होण्याचा धोका असतो. झिकावर अद्याप कोणताही रामबाण उपचार नाही. झिकाची लागण झालेल्या रुग्णांना डॉक्टर ताप किंवा डोकेदुखीच्या औषधांची शिफारस करतात. त्याचप्रमाणे अधिक आराम करण्याचा सल्‍ला देतात. डेंग्यू, चिकुनगुनिया किंवा झिकासारख्या आजारांपासून दूर राहण्यासाठी डासांपासून बचाव करणे गरजेचे आहे.

Back to top button