‘द खान अल साबून’ : जगातील सर्वात महाग साबण; त्याच्या किमतीत सोन्याचा हार देखील सहजपणे विकत घेता येईल | पुढारी

'द खान अल साबून' : जगातील सर्वात महाग साबण; त्याच्या किमतीत सोन्याचा हार देखील सहजपणे विकत घेता येईल

त्रिपोली : जगातील सर्वात महाग साबणाची किंमत किती असेल, असा प्रश्न विचारला तर दोन-एक हजारांपर्यंत असे उत्तर आले तर एकवेळ ते स्वाभाविकही मानले जाऊ शकते. कारण, हजार-दोन हजार नव्हे तर अगदी 100-200 रुपयांचा साबण घेत असतानाही हजार वेळा विचार केला जाणे साहजिकच असते. पण, जगात एक साबण असाही आहे, ज्याची किंमत पाहूनच डोळे दिपून जातील. कारण, एक साबण इतका महागडा आहे की, त्या किमतीत सोन्याचा हार देखील सहजपणे विकत घेता येऊ शकेल.

आता एखादा साबण इतका महागडा असण्याचे कारण काय, असा प्रश्न पडू शकेल. पण, याचे उत्तर असे आहे की, या साबणात चक्क सोने व हिरे देखील घातले जातात. त्यामुळेच हा साबणाचा दर अव्वाच्या सव्वा असतो.

लेबनॉनमधील त्रिपोली येथे हा साबण तयार केला जातो. याची किंमत 2800 डॉलर्स अर्थात 2 लाख 7 हजार 800 रुपये इतके आहे. बशर हसन अँड सन्स ही कंपनी या साबणाची निर्मिती करते. या साबणाला त्यांनी ‘द खान अल साबून’ असे नाव दिले आहे. याशिवाय, या कंपनीत अनेक लक्झरी साबण व क्रीम देखील तयार होतात. त्रिपोलीतील या जागेवर साबण तयार करण्याची परंपरा 15 व्या शतकापासून चालत आली आहे.

हसन अँड सन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, साबणाच्या पहिल्या टप्यात सोन्याची व हिर्‍याची पावडर वापरली जाते. प्रारंभी हा साबण पनीरच्या एका तुकड्यासारखा दिसून येतो. पण, नंतर त्याचे स्वरूप बर्‍याच प्रमाणात बदलले गेले. हा साबण घेणारे बहुतांशी ग्राहक दुबई शहरातील आहेत. हाताने तयार केले जाणारे हे साबण अगदी मोजक्या दुकानात उपलब्ध असतात. बरेचसे खरेदीदार दुबईत आहेत तर काही अगदी महत्त्वाच्या लोकांपर्यंतच हे साबण पोहोचवले जातात. हा सोन्याचा साबण सर्वप्रथम 2013 मध्ये तयार केला गेला आणि कतारच्या प्रथम महिलेला भेट स्वरूपात देण्यात आला होता. या साबणात 17 ग्रॅम खरे सोने असते. याशिवाय, हिर्‍याची पावडर, शुद्ध तेल, सेंद्रिय मध, खजूरसह काही घटक यात वापरले जातात.

Back to top button