Mount Kailash : कैलास पर्वतावर का होऊ शकत नाही गिर्यारोहण? | पुढारी

Mount Kailash : कैलास पर्वतावर का होऊ शकत नाही गिर्यारोहण?

नवी दिल्ली : शिवशंकर व परिवाराचे निवासस्थान म्हणून तमाम हिंदू लोक कैलास पर्वताकडे पाहत असतात. या पर्वताचा परिसर भारताच्या हद्दीत नसून तो तिबेट म्हणजेच पर्यायाने चीनच्या हद्दीत आहे, पण तरीही या पर्वताविषयीची अतूट आस्था त्याच्या दर्शनासाठी भाविकांना खेचतच असते. आता उत्तराखंडमध्येच एक असे ठिकाण समोर आले आहे जिथून कैलास पर्वताचे स्पष्ट दर्शन घडते. उत्तराखंडच्या लिपुलेख पास येथून कैलास दर्शन घडू शकते व त्यासाठी चीनमध्ये जाण्याची गरज राहणार नाही. विशेष म्हणजे एव्हरेस्टपेक्षा उंचीने बराच लहान असूनही कैलास पर्वतावर अद्याप एकही गिर्यारोहक जाऊ शकलेला नाही. त्यामागे काही गूढ कारणे दडलेली आहेत.

आपण 6,656 मीटर उंचीचा कैलास पर्वत केवळ दूरवरून पाहिला आहे. त्याची उंची एव्हरेस्टपेक्षा 2000 मीटर कमी आहे, परंतु अद्याप कोणीही त्यावर चढाई करू शकलेले नाही. यामुळे लोक याला एक रहस्यमय पर्वत देखील म्हणतात. बरेच लोक म्हणतात की, या पर्वतावर बर्‍याच अलौकिक शक्ती आहेत आणि वैज्ञानिकही या युक्तिवादासमोर मौन बाळगतात. या पर्वतावर चढण्यासाठीही बरेच प्रयत्न केले गेले, परंतु आतापर्यंत कोणालाही यश आले नाही. बर्‍याच लोकांचे म्हणणे आहे की, हवामानामुळे कोणीही येथे पाय ठेवू शकले नाही.

बरेच लोक असा दावा करतात की येथे नेव्हिगेशन करणे खूप अवघड आहे कारण येथे वारंवार दिशाभ—म होतो. सरगे सिस्टियाकोव्ह या रशियन गिर्यारोहकाने सांगितले की, ‘जेव्हा मी कैलास पर्वताच्या अगदी जवळ पोहोचलो तेव्हा माझे हृदय जोराने धडधडू लागले. आजपर्यंत कोणीही चढू शकले नाही अशा पर्वताच्या अगदी समोर होतो, पण अचानक मला खूप अशक्तपणा जाणवू लागला आणि मी इथे आणखी थांबू नये, असा विचार माझ्या मनात आला. यानंतर मी जसाजसा खाली उतरू लागलो तसे माझे मन हलके होत होते. रशियन नेत्र रोग विशेषज्ञ अर्नेस्ट मुलादाशेव म्हणाले की, कैलास पर्वत एक नैसर्गिक रचना नाही तर अलौकिक शक्तींमुळे तयार झालेला पिरॅमिड आहे.

ते म्हणाले की, कैलाश पर्वत 100 रहस्यमय पिरॅमिड्सपासून बनलेला आहे. हा पर्वत ‘अ‍ॅक्सिस मुंडी’चे ठिकाण असल्याचेही म्हटले जाते जिथे सर्व दिशा एकत्र येतात किंवा जे जगाचे केंद्रस्थान आहे. बरेच लोक म्हणतात की कैलास पर्वत अत्यंत किरणोत्सर्गी आहे. त्याचा उतार 65 अंशांपेक्षा जास्त आहे. माऊंट एव्हरेस्टवर हा उतार 40 ते 60 अंशांपर्यंतचा आहे. या कारणास्तव गिर्यारोहक देखील येथे चढण्यास घाबरतात. सध्या कैलास पर्वत चढून जाण्यास किंवा तिथे गिर्यारोहण करण्यास पूर्णपणे बंदी आहे. हिंदू, बौद्ध आणि जैन अशा तीन धर्मातील लोकांसाठी हा पवित्र पर्वत आहे. बौद्ध भिक्षू योगी मिलारेपा 11 व्या शतकात कैलास पर्वतावर चढून गेले होते असे म्हणतात. या पवित्र आणि रहस्यमय पर्वतावर जाऊन जिवंत परत येणारी ही आधुनिक जगातील पहिली व्यक्ती असल्याचे म्हटले जाते.

Back to top button