मृत्युमुखातून आलेल्या कुत्र्याने 150 मांजरांचा केला सांभाळ! | पुढारी

मृत्युमुखातून आलेल्या कुत्र्याने 150 मांजरांचा केला सांभाळ!

लंडन : कुत्र्या-मांजराचे सख्य आणि विळ्या-भोपळ्याचे सख्य यामध्ये काही फरक नाही असे आपण म्हणतो. मात्र त्यालाही अनेक अपवाद पाहायला मिळत असतात. दहा वर्षांपूर्वी रेलान नावाच्या कुत्र्याला एका महिलेने मृत्युमुखातून वाचवले होते. या कुत्र्याला मारले जाणार होते आणि त्यापूर्वी केवळ दोन दिवस आधी तिने रेलानला आपल्या घरी आणले. ही महिला मांजरांनाही सांभाळत असते व याकामी रेलान तिला मदत करू लागला. आतापर्यंत त्याने सुमारे 150 मांजरांच्या दत्तक पित्याची भूमिका बजावली आहे!

लॉरा नावाच्या महिलेने हा कुत्रा पाळला आहे. मृत्यूच्या तावडीतून सुटून लॉराच्या घरी आल्यावर त्याच्याही जगण्याचा उद्देश मांजरांच्या छोट्या पिल्लांना सांभाळणे हा बनला. लॉराने याबाबतची माहिती इन्स्टाग्रामवर दिली आहे. निराधार पिल्लांना वाचवणे आणि त्यांना मोठे करण्याचे काम लॉरा करते. रेलानही याकामी तिला मदत करीत असतो.

मांजराच्या छोट्या पिलांना कसे हाताळायचे हे त्यालाही समजलेले आहे. विशेष म्हणजे यासाठी त्याला कोणतेही खास प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. मात्र त्याने स्वतःच अतिशय कमी काळात सर्व गोष्टी शिकून घेतल्या, असे लॉरा सांगते. तो या पिल्लांना स्वतःची पिल्ले असल्यासारखेच वागवतो. त्यांना चाटून स्वच्छ करतो, पाठीवर बसवून फिरवतो आणि त्यांना जवळ घेऊन झोपतो. वॉटसन नावाच्या पिल्लाला त्याने सर्वप्रथम असे वाढवले होते व अजूनही दोघांची चांगली दोस्ती आहे.

Back to top button