104 वर्षांच्या ‘स्कायडायव्हर’ आजींचे निधन | पुढारी

104 वर्षांच्या ‘स्कायडायव्हर’ आजींचे निधन

शिकागो : जगातील सर्वात वृद्ध स्कायडायव्हर होण्याचा काही दिवसांपूर्वीच विक्रम करणार्‍या अमेरिकेतील 104 वर्षे वयाच्या आजीबाईंचे निधन झाले आहे. डोरोथी हॉफनर असे नाव असलेल्या या आजीबाईंनी 1 ऑक्टोबरला विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी घेत स्कायडायव्हिंग केले होते. यापूर्वी हा विक्रम 103 वर्षे वयाच्या एका स्विडिश महिलेच्या नावावर होता. त्यांचा विक्रम मोडल्यानंतर पुढच्याच आठवड्यात डोरोथी यांचे निधन झाले.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, डोरोथी या ब्रुकडेल लेक व्ह्यू सिनियर लिव्हिंग कम्युनिटी येथील त्यांच्या खोलीत मृतावस्थेत आढळल्या. रविवारी रात्रीच त्यांचा मृत्यू झाल्याचे मानले जाते. वयाच्या 104 व्या वर्षीही त्यांनी स्कायडायव्हिंगचा आनंद लुटला होता. शिकागोपासून सुमारे 80 मैलावर असलेल्या ओटावा येथे उतरल्यानंतर त्यांनी माध्यमांना सांगितले की यामध्ये भीतीदायक असे काहीही नव्हते. तो अनुभव छान आणि शांत होता.

स्कायडाईव्ह शिकागो आणि अमेरिकन पॅराशूट असोसिएशनच्या प्रवक्त्याने माध्यमांना सांगितले की वर्ल्ड रेकॉर्ड करणार्‍या डोरोथी यांचे रोमांचक जीवन आता संपुष्टात आले आहे. त्यांनी त्यांचे जीवन अतिशय सन्मानाने जगले. स्कायडायव्हिंग हा एक प्रकार असा आहे जो आपल्यापैकी बरेच जण आपल्या साहसी बकेट लिस्टमध्ये जोडतात, पण डोरोथी आम्हाला आठवण करून देतात की असे साहसी जीवन जगण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो! डोरोथी यांची पाच वर्षांपासून देखभाल करणार्‍या नर्सने सांगितले की त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, परंतु लवकरच त्यांच्या पोस्टमार्टम अहवालातून ते समजेल.

Back to top button