न्यूयॉर्क : सूर्यावर पृथ्वीवरील महासागरांइतके सोन्याचे भांडार! | पुढारी

न्यूयॉर्क : सूर्यावर पृथ्वीवरील महासागरांइतके सोन्याचे भांडार!

न्यूयॉर्क : सोन्याचा खजिना म्हटलं की आजही लोकांचे कुतूहल चाळवले जाते. जगभरातील अर्थव्यवस्था असो किंवा भारतीय परंपरा, आवडीनिवडी असोत… सोन्याचे महत्त्व अबाधित आहे. या राजधातूचे लोकांना मोठेच आकर्षण असते. मात्र पृथ्वीवर सोन्याचे साठे मर्यादित आणि दुर्मीळ आहेत. एका ठिकाणी मात्र पृथ्वीवरील महासागरांपेक्षाही अधिक प्रमाणात सोने आहे. हे ठिकाण म्हणजे सूर्य!

सूर्यावरील सोन्याचा शोध कसा लागला हे पाहणेही रंजक आहे. सन १८५९ मध्ये जर्मनीतील मॅनहिम शहरातील आग पाहून प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट बेन्सन आणि गुस्टाव किशॉफ यांना प्रकाशाला वेगवेगळ्या वेव्हलेंग्थमध्ये विभाजित करून त्यामधील रासायनिक घटकांचा छडा लावण्याची कल्पना सुचली. यामधूनच त्यांनी स्पेक्ट्रोस्कोपची निर्मिती केली. त्यांनी खिडकीत असा स्पेक्ट्रोस्कोप लावून आगीच्या ज्वाळांमधील बेरियम आणि स्ट्रॉन्शियम शोधले. अशाच स्पेक्ट्रोस्कोपचा वापर सूर्य व अंतराळातील अन्य तार्‍यांच्या निरीक्षणासाठी करण्याचा सल्ला रॉबर्ट बेन्सन यांनीच दिला.

सुमारे दहा वर्षांनी म्हणजे 18 ऑगस्ट 1868 रोजी खग्रास सूर्यग्रहणावेळी अनेक संशोधकांनी स्पेक्ट्रोस्कोपीच्या मदतीने सूर्यावरील हेलियमचा शोध लावला. त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा पद्धतीने सूर्याच्या वातावरणातील कार्बन, नायट्रोजन, लोह आणि अन्य काही जड धातूंचा शोध लावण्यात आला. त्यानंतर दीर्घकाळ सुरू राहिलेल्या संशोधनातून दिसून आले की, सूर्यावर 2.5 ट्रिलियन टन सोनेही आहे. इतके सोने पृथ्वीवरील सर्व महासागर भरूनही शिल्लक राहू शकते.

पृथ्वीवर आढळणारे सोने हे सूर्यासारख्या तार्‍यांचे न्यूट्रॉन स्टार बनण्याच्या आणि मग आपापसात धडक होण्याच्या प्रक्रियेतून पोहोचलेले आहे.

Back to top button