‘अशा’ ग्रहांवर असू शकते जीवसृष्टी | पुढारी

‘अशा’ ग्रहांवर असू शकते जीवसृष्टी

वॉशिंग्टन : पृथ्वीच्या बाहेर अन्य ग्रहांवर जीवसृष्टी चा शोध घेत असताना संशोधकांकडून अनेक मापदंड लावले जात असतात. त्यामध्ये एखादा ग्रह आणि त्याचे तार्‍यापासूनचे अंतरही महत्त्वाचे असते. हे अंतर इतके असावे लागते की, ग्रहावर योग्य प्रमाणात उष्णता व प्रकाश मिळेल. खडकाळ, ठोस पृष्ठभाग, पाणी, ऑक्सिजन, दाट वातावरण आदी अन्य गोष्टी महत्त्वाच्या असतात.

आता एका नव्या संशोधनात आढळले आहे की, एखादा ग्रह आपल्या तार्‍याभोवती प्रदक्षिणा घालत असताना एका बाजूला थोडा झुकलेला असेल तर त्यावर जीवसृष्टी ची शक्यता वाढते.

एखादा ग्रह त्याच्या अक्षावर झुकलेला असेल तर त्याच्यावरील महासागरांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. त्यामुळे त्यामधील जैविक घटक अधिक ‘रिसायकल’ होतात. पृथ्वी जितक्या अंशात झुकलेली आहे, तितका कोन असेल तर सूक्ष्म जीवांसाठी अनुकूल स्थिती निर्माण होते.

तसेच मोठ्या जीवांमध्येही चयापचय क्रिया चांगली असते. त्यामुळे ऑक्सिजन निर्माण करणार्‍या साध्या जीवांपासून ते अधिक गुंतागुंतीची व प्रगत रचना असणारे जीवही निर्माण होण्याची शक्यता वाढते. पुर्डू युनिव्हर्सिटीच्या मुख्य संशोधिका स्टेफनी ऑल्सन यांनी सांगितले की, संशोधकांनी या अध्ययनासाठी एक मॉडेल तयार केले.

त्यामध्ये जीवसृष्टी ला अनुकूल अशी स्थिती ठेवण्यात आली. एखाद्या स्थितीत बदल झाल्यास ऑक्सिजनचे प्रमाण आणि तो निर्माण करणार्‍या जीवांवर होणारा परिणामही समजून घेण्यात आला. त्यामध्ये आढळले की, एखाद्या ग्रहावर लांब दिवस, पृष्ठभागावरील अधिक दाब आणि जमिनीचे खंड बनल्याने ऑक्सिजन वाढते.

Back to top button