सिंगापूर मध्ये प्रयोगशाळेत बनवलेल्या ‘चिकन’ची खमंग डिश! | पुढारी

सिंगापूर मध्ये प्रयोगशाळेत बनवलेल्या ‘चिकन’ची खमंग डिश!

सिंगापूर : भविष्यात प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या विकसित केलेल्या मांसाचा जेवणासाठी वापर मोठ्या प्रमाणात होईल व अन्नासाठी प्राण्यांची हत्या करणे कमी होईल, असे म्हटले जाते. त्याची एक झलक सिंगापूर मध्ये पाहायला मिळत आहे. तेथील एका रेस्टॉरंटमध्ये प्रयोगशाळेत विकसित केलेल्या चिकन मीटची डिश उपलब्ध करण्यात येणार आहे. सिंगापूरच्या फूड एजन्सीने म्हटले आहे की, लॅबमध्ये तयार केलेले हे मीट सुरक्षित असून ते बाजारात वापरण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

अमेरिकन स्टार्टअप ‘ईट जस्ट’ने प्रयोगशाळेत ‘सेल कल्चर’च्या मदतीने हे मीट विकसित केले आहे. ‘ईट जस्ट’चे सीईओ जोश टॅट्रिक यांनी सांगितले की, लवकरच सिंगापूर च्या रेस्टॉरंटमध्ये आमच्या या मीटपासून बनवलेले स्वादिष्ट पदार्थ खाण्यास मिळतील. सुरुवातीला हे मीट प्रिमियम किमतीत, थोडे महाग मिळेल. पण जसजसे त्याचे उत्पादन वाढेल तशा त्याच्या किमतीही कमी होतील. जगभरात इको फ्रेंडली वस्तू तयार होत आहेत.

आम्ही फूड इंडस्ट्रीलाही त्यासाठी विकसित करीत आहोत. सिंगापूर च्या रेस्टॉरंटमध्ये प्रथमच कल्चर मीटपासून बनवलेल्या डिशेस उपलब्ध होतील. 2050 पर्यंत अशा कृत्रिमरीत्या विकसित केलेल्या मांसाची आहारासाठीची विक्री 70 टक्क्यांपर्यंत वाढेल. ती पर्यावरणासाठीही एक चांगली बाब असेल.

Back to top button