

लंडन : जल-वायू परिवर्तन ही जगासाठी मोठी समस्या ठरली आहे. यावर तमाम देशांनी अनेक उपाय अंमलात आणण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ही समस्या वर्षागणिक अधिक गंभीर बनू लागली आहे. खरे तर या समस्येने मानवजातीचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, याच्या प्रभावातून पशू-पक्षी, जनावरे, किीटक असे जीवही सुटेनासे झाले आहेत.
जल-वायू परिवर्तन व त्याचा कीटकांवर होणारा परिणाम यावर नुकतेच एक संशोधन करण्यात आले. या संशोधनातील निष्कर्ष मात्र जगातील सर्व देशांना गंभीर विचार करावयास लावणारे आहेत. कारण जल-वायू परिवर्तनामुळे पृथ्वीवर कीटकांच्या सुमारे 65 टक्के प्रजाती लुप्त होण्याची शक्यता आहे. तसेच जनावरे आणि अन्य जीव लुप्त होण्याचा धोकाही वाढला आहे.
संशोधनात शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, जल-वायू परिवर्तनामुळे पुढील शतकापर्यंत पृथ्वीवरील कीटक व पतंगांच्या सुमारे 65 टक्के प्रजाती लुप्त होणार आहेत. नेचर क्लायमेट चेंज नामक जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनातील माहितीनुसार जल-वायू परिवर्तनामुळे उष्ण कटिबंधातील प्राणीमात्रांची संख्या अस्थिर होऊ शकते.
याशिवाय यातील अनेक प्रजाती लुप्त होऊ शकतात. हे प्रमाण यापूर्वी व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजापेक्षा निश्चितपणे जास्त असेल. येत्या काळात प्राणीमात्रांच्या प्रजाती लुप्त होण्यास स्थानिक वातावरणातील बदल हेच कारण कारणीभूत असेल. स्थानिक पातळीवर होत असलेला बदल हा बहुतेक जीवांना सहन होणारा नसेल. यामुळेच त्यांच्या प्रजाती लुप्त होण्याची शक्यता बळावते.