निसार उपग्रहामुळे मिळणार नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना! | पुढारी

निसार उपग्रहामुळे मिळणार नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना!

वॉशिंग्टन : 2024 च्या पहिल्याच टप्प्यात निसार उपग्रह लाँच केले जाणार असून, यासाठी संशोधकांची तयारी अंतिम टप्यात पोहोचली आहे. अमेरिकन स्पेस एजन्सी नासा व इस्रो यांच्या संयुक्त विद्यमाने या उपग्रहाची निर्मिती केली जात आहे. नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार यावरून या उपग्रहाचे नाव ‘निसार’ असे निश्चित करण्यात आले आहे. हा उपग्रह इको सिस्टीममधील अगदी सूक्ष्म हालचाली व जगभरातील बदलत्या हवामानावर लक्ष ठेवण्याचे काम करेल. भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी, भूस्खलन अशा नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना देणे या उपग्रहामुळे शक्य होईल, असा अभ्यासकांचा होरा आहे.

या उपग्रह निर्मितीसाठी 1.5 अब्ज डॉलर खर्च अपेक्षित आहे. अगदी चांद्रयान-3 मोहिमेपेक्षाही हा खर्च बराच अधिक आहे. पृथ्वीचे अवलोकन करणारा हा सर्वात महागडा उपग्रह आहे. 5 ते 10 मीटरच्या रिझॉल्युशनवर प्रत्येक महिन्याला 4 ते 6 वेळा पृथ्वीच्या पटलावरील आणि बर्फावरील द्रव्यमानाच्या उंचीला रडार इमेजिंगच्या माध्यमातून टिपणे यामुळे साध्य होणार आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून विस्तृत माहिती मिळावी, यासाठी व्हर्च्युअल अँटिना लावला गेला आहे.

इस्रोने निसार युटिलायझेशन प्रोग्रॅमचीही रीतसर घोषणा केली आहे. या माध्यमातून भारतातील अभ्यासक, वैज्ञानिक निसार सॅटेलाईट मिशनच्या डेटापर्यंत पोहोचू शकतील. जूनमध्ये बंगळुरूतील इंजिनिअर्सनी उपग्रहाच्या अंतराळ यान बस व रडारला एकाच वेळी जोडले आहे. यातील पेलोड मार्चमध्ये दक्षिण कॅलिफोर्नियाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीमधून नेण्यात आला होता. या उपग्रहाचा आकार एखाद्या एसयूव्हीप्रमाणे असून त्याचे वजन साधारणपणे 2600 किलोग्रॅम इतके आहे.

Back to top button