Blue Sun : …आणि सूर्य निळा दिसू लागला! | पुढारी

Blue Sun : ...आणि सूर्य निळा दिसू लागला!

लंडन : कधी कधी निसर्गही अनोखी द़ृश्ये दाखवत असतो. एरवी उदय किंवा अस्त होत असतानाचा सूर्य लाल-केशरी दिसत असतो. प्रखर प्रकाश असताना तो सफेद दिसतो. मात्र कधी निळसर रंगाचा सूर्य तुम्ही पाहिला आहे का? ब्रिटनमध्ये नुकतेच असे द़ृश्य पाहायला मिळाले. तेथील लोकांसाठी गुरुवारची सकाळ फारच आश्चर्यकारक ठरली. गुरुवारची सकाळ झाली तेव्हा आकाशातील सूर्य त्यांना नेहमीपेक्षा फारच वेगळा दिसला. यावेळी लोकांना चक्क निळा सूर्य पाहायला मिळाला. त्यामुळेच सोशल मीडियावर ‘ब्लू सन’ची चांगलीच चर्चा रंगल्याचे दिसले. अनेकांनी सोशल मीडियावर या निळ्या सूर्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. अनेकजण सूर्य असा का दिसतोय असं म्हणत चिंता व्यक्त केली. मात्र या ‘ब्लू सन’चं रहस्य नंतर उलगडलं आणि अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला!

एका एक्स युजरने (ट्विटर युजरने), ‘28 सप्टेंबर 2023 मध्ये युनायटेड किंगडममधील हर्टफोर्डशायरमध्ये असा सूर्य दिसत होता,’ अशी पोस्ट केली आहे. अन्य एकाने, ‘ज्वालामुखीच्या राखेमुळे आज स्कॉटलंडमध्ये निळा सूर्य पाहायला मिळाला,’ असं लिहिलं आहे. ब्रिटनमधील हवामान विभागाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. येथील एका वैज्ञानिकाने दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनच्या पश्चिमेकडील भागामध्ये सध्या दाट धुक्याची समस्या आहे. पश्चिमेकडून वाहणार्‍या उष्ण वार्‍यांमुळे उत्तर अमेरिकेतील कॅनडामधील जंगलांमध्ये वणवे पेटत आहेत. या वणव्यांचा धूर ब्रिटनमध्येही पसरला आहे. कॅनडामधील जंगलांमध्ये पेटलेल्या वणव्यामुळे ब्रिटनमध्येही मोठ्या प्रमाणात धूर पसरला आहे. त्यामुळेच सूर्य प्रकाश थेट पृथ्वीपर्यंत पोहचत नसून सूर्य याच कारणाने निळा दिसत आहे.

Back to top button