काहीच न करण्याचे काम करणारा माणूस! | पुढारी

काहीच न करण्याचे काम करणारा माणूस!

टोकियो : काही नोकर्‍या अतिशय आकर्षक असतात. चॉकलेटची चव चाखण्यापासून ते मऊ मऊ गादीवर झोपून ही गादी कशी आहे याचा रिपोर्ट देण्यापर्यंतच्या अनेक सुखद नोकर्‍या अस्तित्वात आहेत. मात्र जपानमधील एक तरुण असे काम करतो, ज्यामध्ये काहीच करायचे नसते. याचा अर्थ काहीच काम न करण्याचे तो काम करतो. यामधून तो लाखो रुपयांची कमाईही करतो हे विशेष! त्याने गेल्या चार वर्षांमध्ये या कामातून सुमारे अडीच कोटी रुपये कमावले आहेत.

जपानची राजधानी टोकियोमध्ये राहणार्‍या या माणसाचे नाव आहे शोजी मोरिमोटो. शोजीच्या या कामाचा जगभरातील लोकांना हेवा वाटू शकतो. त्याला काही काम न करण्याचे पैसे मिळतात. लोक शोजीला केवळ आपल्यासोबत राहण्याचे पैसे देतात. सध्याच्या धकाधकीच्या, घाईगडबडीच्या जगात अनेक लोक एकाकी आहेत. त्यांना आपल्यासोबत कुणी तरी घटकाभर असावे असे वाटते. असे लोक शोजीला पैसे देऊन काही वेळ सोबत घेतात.

एका बुकिंगसाठी शोजी सुमारे साडेपाच हजार रुपये घेतो. त्याचे काम आहे लोकांना ‘कंपनी’ देणे! या दरम्यान त्याला काही विचारले तरच तो उत्तर देतो, अन्यथा गप्प राहतो. केवळ आपल्यासोबत कुणीतरी आहे याच भावनेने लोकांना आधार मिळतो. शोजीला आपले जास्तीत जास्त ग्राहक ऑनलाईनच मिळतात. त्याच्या एकाच ग्राहकाने त्याला तीनशेपेक्षा अधिक वेळा सोबतीला घेतले. तो लोकांना डिनर, एखादी पार्टी, शॉपिंगवेळी सोबत देतो. कुणाला कंपनी द्यायची व कुणाला नाही हे शोजी स्वतः ठरवतो. एका व्यक्तीने शोजीला फ्रीज हटवण्यासाठी सोबत येण्यास सांगितले होते, पण शोजीने नकार दिला!

Back to top button