समुद्रात सापडला २५०० वर्षांपूर्वीच्या भांड्यांचा खजिना! | पुढारी

समुद्रात सापडला २५०० वर्षांपूर्वीच्या भांड्यांचा खजिना!

अथेन्स : ग्रीक बेट कायथिराजवळ एजियन सागरात एका प्राचीन जहाजाचे अवशेष सापडले आहेत. इसवी सनापूर्वीच्या चौथ्या-पाचव्या शतकाच्या मध्यातील हे जहाज आहे. 2500 वर्षांपूर्वी सुरईसारखी अनेक भांडी घेऊन जाणारे हे जहाज समुद्रात बुडाले होते व त्यामधील भांडी समुद्राच्या तळाशी इतस्तः पडलेली आढळून आली आहेत. अशा प्राचीन भांड्यांचा खजिनाच आता गवसला आहे.

ग्रीक पॉवर ट्रान्समिशन कंपनीच्या ‘इंडिपेंडंट पॉवर ट्रान्समिशन ऑपरेटर एसए’ने सागरी सर्वेक्षणावेळी जहाजाचे हे अवशेष शोधून काढले. हा सर्व्हे क्रेते-पेलोपोनिस सबसी इंटरकनेक्शनच्या सीफ्लोअर मॅपिंगसाठी केला जात होता. ही पाण्याखाली असणारी सर्वात मोठी एसी पॉवर केबल आहे. एफोरेट ऑफ अंडरवॉटर अंटिक्विटीज आणि हेलेनिक सेंटर फॉर मरीन रिसर्चच्या संशोधकांनी याबाबतची माहिती दिली आहे.

त्यानुसार जहाजाचे अवशेष समुद्रात तळाशी सुमारे 222 मीटर खोलीवर आढळून आले. संशोधकांना या बुडालेल्या जहाजाच्या कार्गो डेकवर एम्फोरस, प्राचीन ग्रीक आणि रोमन साम्राज्यातील भांड्यांचा ढीगच सापडला. दोन मुठी असलेल्या या मोठ्या सुरई वैशिष्ट्यपूर्ण आहेत. अतिशय प्राचीन काळातील एजियन व आयोनियन सागरातील व्यापाराचे पुरावेही यामधून मिळाले.

Back to top button