सोन्यापेक्षाही महागडे आहेत बेन्नूवरील नमुने! | पुढारी

सोन्यापेक्षाही महागडे आहेत बेन्नूवरील नमुने!

वॉशिंग्टन : ओसिरिस रेक्स मिशन यशस्वी झाल्यानंतर बेन्नू लघुग्रहावरील 250 ग्रॅम मातीचे नमुने आणले, त्याचे मोल सोन्यापेक्षाही अधिक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. एखाद्या लघुग्रहावरील नमुने पृथ्वीवर यशस्वीरित्या आणण्यात प्रथमच या निमित्ताने यश लाभले आहे. या मोहिमेंतर्गत या कॅप्सूलला पृथ्वीच्या कक्षेत रिलीज केले गेले. पृथ्वीच्या दिशेने कूच करत असताना या कॅप्सूलचा वेग प्रतितास 43452 किमी इतका होता. साहजिकच, या कॅप्सूलने बेन्नूवरील जे नमुने आणले, ते सोन्यापेक्षाही महाग आहेत.

ओसिरिस रेक्स मोहिमेला 2016 मध्ये सुरुवात केली होती. आता बेन्नूवरून आणलेले 250 ग्रॅमचे नमुने खूपच कमी वाटेल. पण, संशोधकांसाठी ते पुरेसे आहे. रिकव्हरी टीमने अमेरिकेतील युटा येथे हे सॅम्पल कलेक्ट केले. कॅप्सूलला क्लीन रूममध्ये नेत तेथे ते उघडण्यात आले. ज्या बॉक्समध्ये सॅम्पल आहेत, ते ह्यूस्टनमधील जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये नेले जाणार आहेत. तेथेच त्यावर संशोधन होणार आहे.

यापूर्वी जपानने देखील दोन मोहिमांच्या माध्यमातून लघुग्रहातून थोडे नमुने आणले. पण, त्याचे प्रमाण अगदीच अत्यल्प होते. आताचे नमुने बेन्नू लघुग्रहावरील आहेत. 11 सप्टेंबर 1999 रोजी या लघुग्रहाचा शोध लावण्यात आला. तूर्तास, ओसिरिस रेक्स मोहिमेतून इतके सुस्पष्ट झाले आहे की, या लघुग्रहाच्या पृष्ठभागावरील भाग फारसा ठोस नाही. पण, तो छोट्या छोट्या दगडांनी भरलेला आहे. त्याचा व्यास 500 मीटर इतका आहे. अन्य लघुग्रहाप्रमाणेच बेन्नू देखील प्रारंभीच्या सौर मंडळाचे अवशेष आहे. साडेचार अब्ज वर्षांपूर्वी बेन्नूचे जे सौर मंडळ होते, त्यात आताही काहीच बदल झाला नसल्याचा जाणकारांचा कयास आहे. 150 वर्षांनंतर हा लघुग्रह पृथ्वीला धडकण्याची शक्यता आहे. मात्र, ही शक्यता हा फक्त एक अंदाज आहे. याबाबत अद्याप ठोस संशोधन झालेले नाही.

Back to top button