वाफेने स्नान करणारी जमात!

विंडहोक : जगभरात आता बरीच प्रगती झाली आहे. कित्येक ठिकाणी उंच इमारतींच्या रांगाच दिसून येतात. पण, या प्रगतीची दुसरी बाजूही तितकीच धक्कादायक आहे. आजही अशा अनेक जमाती आहेत, ज्या जणू पाषाण युगातच राहतात. या जमातीतील नियम जुन्यापुराण्या युगातीलच आहेत.
यापैकीच एक आहे हिम्बा जमात, जे आजही पिढ्यान्पिढ्या चालणारे नियम पाळत आले आहेत. या जमातीत 50 हजारपेक्षा अधिक लोकांचा समावेश आहे. पण, यानंतरही त्यांच्यात जे नियम पाळले जातात, ते निव्वळ थक्क करणारे असतात. नामिबियात राहणार्या या जमातीत स्नान करण्यावर बंदी आहे. जग प्रगतीच्या पथावर कुठल्या कुठे निघून गेले असले तरी ही जमात मात्र खर्या अर्थाने आहे तेथेच आहे.
हिम्बा जमातीचे स्वत:चे कायदेकानून आहेत. आता ही जमात एरवी सर्वसाधारण वाटते. या जमातीतील लोक पूर्ण दिवस खाण्यापिण्याच्या शोधात भटकत राहतात. काही वेळ शेतीही करतात. पण, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ते पाण्याने स्नान न करता त्याऐवजी वाफेने आंघोळ करतात. याला ‘स्मोक बाथिंग’ असे म्हटले जाते. या जमातीच्या घरात महिलांची मते अजिबात विचारात घेतली जात नाहीत आणि सर्व निर्णय घरातील पुरुषच घेत असतात.