बाटल्यांपासून बनवले तरंगते बेट!

मेक्सिको : मेक्सिकोे शहरातील एक कलंदराने अतिशय अनोखा कारनामा साकारला आहे. त्याने थोड्याथोडक्या नव्हे तर जवळपास दीड लाख प्लास्टिक बॉटल्सचा वापर करत त्या माध्यमातून अतिशय मजबूत असे स्वत:चे तरंगते बेट उभारले आहे. हा कारनामा साकारणार्या अवलियाचे रिचर्ड सोवा असे नाव आहे. रिचर्ड सोवा सुतारकाम करत असे. आता त्याचे या बेटावर घरदेखील आहे. या घरावर आवश्यक अशा सर्व वस्तू उपलब्ध असतात. इतकेच नव्हे तर त्याने या बेटावर सुंदर बगीचा देखील प्रत्यक्षात साकारला आहे. रिचर्ड आता या बेटावर येणार्या पर्यटकांच्या माध्यमातून पैसे मिळवत असतात.
एक कंत्राटदार या नात्याने 13 वर्षे काम केल्यानंतर रिचर्डने हा इकॉलॉजिकल बेट उभारण्याचा निर्णय घेतला. पण, हे बेट उभारण्यासाठी त्याने जी साधनसामग्री वापरली, ती आश्चर्यचकित करणारी होती. त्याने तरंगत्या बेटाला आकार देण्यासाठी दीड लाख प्लास्टिक बाटल्यांचा वापर केला. या बेटाबाबत बोलताना तो म्हणतो, ‘मी साडेसहा वर्षांपूर्वी मेक्सिकोतील बेटावर याची सुरुवात केली होती. शिवाय, इकॉलॉजिकल बोट, अशी सरकार दप्तरी नोंदही केली होती’.
तरंगत्या लाकडी पट्ट्यांवर मँग्रोव्ह लावल्यानंतर त्याची मुळे आतील बाजूस वाढत गेली आणि यामुळे याची रचना आणखी मजबूत झाली. या बेटाने अनेक छोट्या माशांना देखील आपल्या बाजूला आकर्षित केले. या तरंगत्या बेटावर 6 सोलर पॅनेल लावले गेले आहेत आणि यामुळे फ्रीजसारख्या इलेक्ट्रिक उपकरणांना वीज पुरवली जाते.