लखनौ : भारताच्या प्रत्येक शहरात अनेक सुंदर बाग-बगिचे पाहायला मिळतात. देशात अनेक पार्क आहेत जे पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र आशियातील सर्वात मोठे पार्क भारतातच आहे याची अनेकांना कल्पना नसेल. हे पार्क उत्तर प्रदेशात लखनौ येथे असून त्याचे नाव 'जनेश्वर मिश्र पार्क' असे आहे.
'नबाबांचे शहर' असे म्हटल्या जाणार्या राजधानी लखनौच्या गोमती नगर एक्सटेंशनमध्ये तब्बल 376 एकरच्या परिसरात हे पार्क आहे. सन 2014 मध्ये हे पार्क तयार झाले. तिथे पक्ष्यांच्या अनेक सुंदर प्रजाती पाहायला मिळतात. या पार्कमधील सरोवरात गोंडोला नावेतून नौकानयन करण्याचा आनंदही अनेक पर्यटक घेतात. अशा प्रकारच्या नौकेची सुरुवात इटलीच्या व्हेनिस शहरात झाली होती. ही नाव बनवण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे लाकूड वापरले जाते. शिवाय या नावेचा आकारही अन्य नावांपेक्षा वेगळा असतो. ही नाव सतत वीस वर्षे पाण्यात राहूनही खराब होत नाही असे मानले जाते.
या नावेची किंमत सुमारे 16 लाख रुपये आहे. जनेश्वर मिश्र पार्कमधील वॉटर स्क्रीन शो पाहण्यासारखा असतो. पाण्याच्या पृष्ठभागावर डिजिटल उपकरणांच्या मदतीने रंगीबेरंगी द़ृश्ये निर्माण केली जातात. शिवाय हवेतही अनेक द़ृश्ये तरंगत असल्याचे दिसून येते. पाण्यावरही विविध प्रतिमा बनवल्या जातात. या पार्कच्या देखभालीसाठी दरवर्षी सरकार 20 कोटी रुपये खर्च करीत असते. याठिकाणी आता लवकरच स्केटिंग फील्ड तसेच ज्युरासिक पार्कही बनवले जाणार आहे.