टोकियो : भारताने चांद्रयान-3 मोहीम यशस्वी करून दाखवल्यानंतर काही अवधीतच जपानची स्पेस एजन्सी 'जाक्सा'ने आपली चंद्रमोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. 2024 च्या प्रारंभी चंद्रावर पोहोचण्याचे जपानचे लक्ष्य आहे. मात्र, या मोहिमेतील महत्त्वाचा घटक असणारा रोबो हा एखाद्या टेनिस बॉलप्रमाणे आहे. काही जण याला स्टार वार्स चित्रपटातील रोबो असल्याचे म्हणतात. अलीकडेच जाक्साने स्लिम मिशन लाँच केले. या मोहिमेंतर्गत हा अजब रोबो पाठवला गेला असून लुनर एक्सकर्शन व्हिकल- 2 असे त्याचे नाव आहे. हा रोबो सध्या आपल्या दिसण्याने अधिक चर्चेत आला आहे.
लेव्हल 2 हे 2 मीटर उंचीवरून चंद्रावर लाँच केले जाईल आणि त्यानंतर त्याची मोहीम सुरू होणार आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे ते 2 भागात स्वतंत्रपणे चालू शकते. आता हा कोणताही शास्त्रीय प्रयोग नाही तर केवळ तांत्रिक प्रदर्शन आहे. लेव्हल 2 मधील बॅटरी चंद्रावर केवळ दोन तास कार्यरत राहतील. मात्र, याचे डिझाईन व आकार भविष्यातील रोव्हरसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
'जाक्सा'तील रोबोचे वरिष्ठ संशोधक हिरानो दाईची यांनी या रोबोची निर्मिती जपानी अंतराळ एजन्सी, दोशिया विद्यापीठ व टॉमी कंपनीच्या संयुक्त माध्यमातून केली गेली असल्याचे यावेळी सांगितले. या रोबोच्या गोल आकारातील पायावर कंट्रोल बोर्ड व कॅमेरा लावले गेले असून या माध्यमातून पृथ्वीवर छायाचित्र पाठवले जाणार आहे.
अलीकडील काही वर्षांत अनेक देशांनी चंद्रावर मोहिमा आखल्या. यात काही मोहिमा यशस्वी ठरल्या तर काहींना अपयश आले. उदाहरणार्थ ऑगस्टमध्ये रशियाची लुना-25 मोहीम अपयशी ठरली. त्यापूर्वी इस्रायलची देखील पिछेहाट झाली. जपानला मात्र आपली मोहीम यशस्वी होईल, याची खात्री वाटते.