नासाचे अवकाशयान आदळणार लघुग्रहावर | पुढारी

नासाचे अवकाशयान आदळणार लघुग्रहावर

न्यूयॉर्क : ‘नासाचे एक अवकाशयान ताशी 15 हजार मैल इतक्या प्रचंड वेगाने एका लघुग्रहावर आदळणार आहे. अमेरिकन अंतराळ संस्था ही घटना जाणून-बुजून घडवून आणत आहे. दरम्यान, नासा आता या महिन्याच्या अखेरपर्यंत आपले पहिले प्लॅनेटरी डिफेन्स मिशन लाँच करण्याच्या तयारीत आहे.

‘डबल अ‍ॅस्ट्रॉईड रिडायरेक्शन टेस्ट’ (डार्ट) हे मिशन एक लहान लघुग्रह ‘डिमोफोर्स’च्या दिशेने झेपावणार आहे. ‘डिमोफोर्स’ हा लघुग्रह ‘डिडिमोस’ नामक मोठ्या लघुग्रहाभोवती फिरत आहे.

तसे पाहिल्यास डिमोफोर्स या लघुग्रहाकडून पृथ्वीला कोणताही धोका नाही. मात्र, नासाच्या या प्रयोगातून अवकाशयान लघुग्रहावर आदळल्याने कोणता प्रभाव पडू शकतो, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. हा प्रभाव पाहण्यासाठी पृथ्वीवर असलेल्या दुर्बिणींची मदत घेण्यात येणार आहे.

‘डार्ट मिशन’च्या मदतीने लघुग्रहांची पृथ्वीवर होऊ पाहणारी संभाव्य धडक नजरेसमोर ठेवून ती रोखण्यासंबंधीची आपली क्षमता विकसित करण्याच्या प्रयत्न केला जाणार आहे. आपल्या सूर्यमालेत असंख्य लघुग्रह फिरत आहेत. त्यातील एखादा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

नासाचे प्लॅनेटरी डिफेन्स ऑफिसचे लिंडले जॉन्सन यांनी सांगितले की, अंतराळात प्रचंड वेगाने फिरत असलेल्या लघुग्रहांचा मार्ग बदलणे आणि त्यांचा वेग प्रभावित करणे, हाच डार्ट मिशनचा उद्देश आहे.

डार्टला गेल्या 26 ऑक्टोबर रोजी ‘वँडेनबर्ग स्पेस फोर्स’वर नेण्यात आले आहे. त्यानंतर ते अ‍ॅलन मस्क यांच्या स्पेसएक्स पेलोड प्रोसेसिंगमध्ये तैनात करण्यात आले. आता 10 नोव्हेंबर रोजी स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटच्या टॉपवरील अडॅप्टरशी अवकाश यानाला जोडले जाणार आहे.

Back to top button