नवी दिल्ली : हवेचे वाढते प्रदूषण आता लोकांच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरत असल्याचे सिद्ध होत आहे. हॉस्पिटलमधील ओपीडीमध्ये श्वास आणि अॅलर्जीच्या रुग्णांत तब्बल 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. याशिवाय अस्थमाचा अटॅक येण्याचा धोकाही बळावू लागला आहे. तसेच खोकला आणि सर्दीच्या रुग्णांतही वाढ होऊ लागली आहे.
डॉक्टरांच्या मते, हवेचे वाढते प्रदूषण यापासून आपला बचाव करून घेण्याकडे लोक दुर्लक्ष करत आहेत. मात्र, हेच धोकादायक ठरू पाहात आहे. यामुळे प्रदूषण वाढेल असे काही करू नका, तसेच आपल्या आरोग्यााबाबत सावधगिरी बाळगा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
'फोर्टिस रिसर्च इन्स्टिट्यूट'च्या प्लमोनोलॉजी विभागाचे संचालक डॉ. मनोज गोयल यांनी सांगितले की, गेल्या आठवडाभरात लोकांना श्वासासंबंधीच्या समस्या जाणवत होत्या. मात्र, दिवाळीनंतर अशा रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. ज्या लोकांना यापूर्वी श्वासासंबंधी व अस्थमाचा आजार होता आणि त्यांच्यावर उपचार सुरू होता, अशा रुग्णांच्या समस्या वाढल्या आहेत.
याबरोबरच न्यूमोनिया, सीओपीडी अटॅक आणि छातीत झालेल्या इन्फेक्शनचे रुग्ण मोठ्या संख्येने हॉस्पिटलमध्ये येत आहेत. ओपीडीमध्ये अशा रुग्णांच्या संख्येत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे एक अत्यंत धोकादायक संकेत असून पुढील काही दिवस सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. तसेच तातडीने उपचार घ्यावेत.