तेहरान : इराणमधील तेहरान येथे जगभरातील सर्वात मोठे मॉल वसलेले आहे. हे मॉल इतके मोठे आहे की, दिवसभर फिरून ते पाहण्याचा प्रयत्न केला तरी यातील कोणता ना कोणता तरी भाग राहूनच जातो!
भारतात तसे पाहता मॉल संस्कृती आता नवी राहिलेली नाही. अमेरिकेतून आलेला हा ट्रेंड आत भारतातील छोट्या शहरातून देखील पाहिला जाऊ शकतो. मुंबई, दिल्ली, चेन्नई अशा मेट्रो शहरातील काही मॉल बरेच नावाजलेले आहेत. आता, जगातील सर्वात मोठा मॉल कुठे आहे, असा प्रश्न विचारल्यास अमेरिका असे उत्तर येऊ शकेलही. पण, प्रत्यक्षात मात्र अशी वस्तुस्थिती नाही. कारण, जगातील सध्याचे सर्वात मोठे मॉल इराणमध्ये असल्याचे अधोरेखित झाले आहे.
ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, तेहरानमध्ये स्थित इराण मॉल जगातील सर्वात मोठा मॉल आहे. हा मॉल इतका मोठा आहे की, तो दिवसभर पाहण्याचा प्रयत्न केला तरी पूर्ण होऊ शकत नाही. हा मॉल सात मजली असून त्याचे वरचे इन्फ्रास्ट्रक्चर 1.35 मिलियन स्क्वेअर मीटर इतके आहे.
हा मॉल उभा करतानाही साहजिकच मोठी यंत्रणा राबवावी लागली होती. या 7 मजली टोलेजंग इमारतीच्या काँक्रिटचे कामच तब्बल सात दिवस चालले होते. इराणमधील या मॉलमध्ये एकूण 700 दुकाने असून यात स्थानिक व आंतरराष्ट्रीय ब्रँड सहजपणे मिळून येतात. या मॉलमध्ये एकूण 12 आयमॅक्स सिनेमा आहेत. शिवाय, एक थिएटर हॉल असा आहे, ज्यात 2 हजार लोक सहज सामावू शकतात. या मॉलमध्ये एक वस्तू संग्रहालय आहे. शिवाय, अम्युझमेंट पार्क, रूफटॉप टेनिस कोर्ट, कन्व्हेन्शन सेंटर व अनेकाविध हॉटेल्सही समाविष्ट आहेत. या मॉलमधील मिरर हॉल आणखी एक वैशिष्ट्य असून त्यात चक्क 3 कोटींहून अधिक काचेचे तुकडे आहेत. याशिवाय यातील लायब्ररीत 45 हजारांहून अधिक पुस्तकांचा समावेश आहे.