महासागर असलेल्या बाह्यग्रहाचा शोध | पुढारी

महासागर असलेल्या बाह्यग्रहाचा शोध

वॉशिंग्टन : ‘नासा’च्या संशोधकांनी अनेक प्रकाशवर्ष अंतरावर असलेल्या एका महाकाय बाह्यग्रहाचा शोध लावला आहे. या बाह्यग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यावर एक महासागरही आहे. तसेच या ग्रहावरील जीवसृष्टीचा संकेत देणार्‍या एका रसायनाचाही छडा लावण्यात आला आहे. ‘नासा’च्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने या ग्रहाचा शोध लावला.

हा ग्रह पृथ्वीपेक्षा 8.6 पटींनी अधिक मोठा आहे. त्याला ‘के2-18बी’ असे नाव देण्यात आले आहे. त्याच्या वातावरणाचाही अभ्यास करण्यात आला. त्यावेळी त्याच्या वातावरणात मिथेन आणि कार्बन डायऑक्साईडसह कार्बनच्या प्रभावातील अणूंच्या अस्तित्वाचाही छडा लागला. हा एक ‘हायसीन एक्सोप्लॅनेट’ असू शकतो. त्यामध्ये हायड्रोजन संपन्न वातावरण आणि पृष्ठभागावर महासागर असण्याची दाट शक्यता दिसते. त्याच्या वातावरणाच्या वैशिष्ट्यांची सुरुवातीची माहिती ‘नासा’च्या हबल या अंतराळ दुर्बिणीच्या सहाय्याने मिळाली होती.

त्यामुळे त्याबाबत पुढे तपशीलवार संशोधन करण्यात आले. हा ग्रह राहण्यास योग्य अशा ठिकाणी तुलनेने थंड आणि खुजा तारा असलेल्या ‘के2-18’ भोवती प्रदक्षिणा घालतो. तो पृथ्वीपासून 120 प्रकाशवर्ष अंतरावर आहे. त्याचा आकार पृथ्वी आणि नेपच्यूनच्या दरम्यानचा आहे. केम्बि-ज युनिव्हर्सिटीतील खगोलशास्त्रज्ञ निक्कू मधुसुदन यांनी याबाबतची माहिती दिली.

संबंधित बातम्या
Back to top button