‘हे’ मासे चक्क साडीने पकडतात! | पुढारी

‘हे’ मासे चक्क साडीने पकडतात!

हैदराबाद : अगदी धाग्यासारखे दिसणारे लहान लहान मासे… पण यांचा दर किलोला तीन ते चार हजार इतका. हे मासे आहेत चीरा मीनू. गोदावरी नदी आंध्र प्रदेशच्या बंगाल उपसागराला जिथे जाऊन मिळते, तिथे हे चीरा मीनू मासे आढळतात. खासकरून हिवाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे दिवाळीच्या दोन-तीन आठवड्यांमध्ये हे मासे मिळतात. तेव्हा या माशांना खूप मागणी असते.

गोदावरी नदी जिथे समुद्राला मिळते, त्या खाडीच्या भागात यानम नावाचं एक छोटंसं गाव आहे. या गावात या माशांचा मोठा व्यापार होतो. हे मासे इतके लहान असतात की, त्यांना मच्छरदाणी किंवा साडीनेच पकडावं लागतं. हे मासे प्रचंड स्वादिष्ट आहेत. त्याला जगभरातून खूप मागणी असते. अगदी अमेरिकेतही याची निर्यात केली जाते. यानम येथील रहिवासी सूर्यप्रकाश सांगतात की, चीरा मीनू मासे वर्षातून एकदाच मिळतात. त्यामुळे लोक ते खरेदी करण्यासाठी यानम परिसरात गर्दी करतात. बहुतांश लोक हे मासे इथेच खाऊन संपवतात. हे मासे साड्यांनी पकडले जात असल्यामुळेच त्यांना ‘चीरा मीनू’ असं नाव पडलं आहे.

गोदावरीच्या खाडी परिसरात खारफुटीची जंगले मोठ्या प्रमाणात आहेत. खारफुटीमुळे या परिसरात ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे हे मासे या भागात अंडी देतात. पूर्वेकडून वारे वाहू लागले की, या अंड्यांमधून बारीक बारीक मासे बाहेर पडतात. गोदावरीच्या प्रवाहात उलट्या दिशेने पोहून येणारे हे मासे पकडून त्यांची विक्री केली जाते. यानमशिवाय डॉ. बी. आर आंबेडकरनगर, कोनासिमा आणि पूर्व गोदावरी जिल्ह्यातही आढळून येतात. चीरा मीनू मासे जवळपास 3 हजार रुपये किलो दराने विकले जातात. कधी कधी भाव 5 हजार रुपये किलोपर्यंत जातो. हे मासे किनार्‍याजवळच जास्त प्रमाणात सापडतात. आतमध्ये खोल समुद्रात गेलं की यांचं प्रमाण कमी होत जातं.

संबंधित बातम्या
Back to top button