‘नासा’च्या अंतराळयानाला धडकणार्‍या लघुग्रहात अनपेक्षित सूक्ष्म बदल! | पुढारी

‘नासा’च्या अंतराळयानाला धडकणार्‍या लघुग्रहात अनपेक्षित सूक्ष्म बदल!

वॉशिंग्टन : सप्टेंबर 2022 मधील डार्ट मोहिमेत ‘नासा’ने रॉकेटच्या माध्यमातून जाणूनबुजून धक्का दिलेल्या ‘डिमोर्फोस’ या लघुग्रहात अलीकडील काही कालावधीत अनेक अनपेक्षित बदल जाणवत आले आहेत. नासाने मागील वर्षभरात या लघुग्रहाचे बारीक निरीक्षण केले. त्यात अनेक सूक्ष्म, अनपेक्षित बदल नोंदवले गेले आहेत, अशी माहिती नव्या डाटातून देण्यात आली आहे.

नासाने 26 सप्टेंबर 2022 रोजी डबल अ‍ॅस्टेरॉईड रिडायरेक्शन टेस्ट डार्ट या मोहिमेंतर्गत 177 मीटर्सचे स्पेस रॉक सदर लघुग्रहावर आदळवले. त्यानंतर हा लघुग्रह आपल्या नजीकचा दुसरा लघुग्रह डिडीमॉसच्या दिशेने कलत असल्याचे आढळून आल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. अंतराळयानाने धडक दिल्यानंतर किमान महिनाभर लघुग्रहात अनेक सूक्ष्म बदल नोंदवले गेले आणि ते अपेक्षितदेखील होते, असे नासाने म्हटले आहे.

कॅलिफोर्नियातील हायस्कूल शिक्षक जोनाथन स्विफ्ट व त्यांच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील 0.7 मीटर्सच्या टेलिस्कोपमधून सर्वप्रथम या बदलाचे निरीक्षण नोंदवले. डार्ट इम्पॅक्टनंतर काही आठवड्यांनी नासाने अशी घोषणा केली की, डिमोर्फोस आपल्या ऑर्बिटमध्ये किंचीत संथ झाले आहे. मात्र, स्विफ्ट व त्यांच्या विद्यार्थ्यांनी एका महिन्यानंतर डिमोर्फोसचा पुन्हा अभ्यास केला, त्यावेळी हा लघुग्रह आणखी एका मिनिटाने मंद झाला असल्याचे निदर्शनास आले. धडकेनंतर त्याचा वेग ठरावीक अंतराने कमी होत असल्याचे निरीक्षण यावेळी नोंदवले गेले.

स्विफ्ट यांनी आपल्या क्लासमध्ये नोंदवले गेलेेले निष्कर्ष जूनमध्ये आयोजित अमेरिकन अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी कॉन्फरन्समध्ये मांडले. डार्ट टीमने त्यानंतर डिमोर्फोस आपल्या ऑर्बिटमध्ये काहीसे संथ होत असल्याचे म्हटले. मात्र, त्यांच्या आकडेवारीप्रमाणे 15 सेकंदाचा अतिरिक्त स्लो डाऊन नोंदवला गेला आहे. डार्ट टीम येत्या काही आठवड्यांत आपल्या निष्कर्षाबाबत स्वतंत्र अहवाल जाहीर करणार आहे. मात्र, याचे गूढ उकलण्यासाठी 2026 पर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते, असेही संकेत आहेत. 2026 मध्ये युरोपियन स्पेस एजन्सीचे हेरा अंतराळयान डिमोर्फोसवर दाखल होणार असून त्याचवेळी याचा अधिक अभ्यास होऊ शकणार आहे.

Back to top button