काळ आला होता; पण वेळ आली नव्हती! | पुढारी

काळ आला होता; पण वेळ आली नव्हती!

वॉशिंग्टन : मनुष्यच नव्हे तर काही वेळा प्राणीदेखील आपल्याला अनेक धडे देऊन जात असतात. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यातही असेच दिसून येते की, संकटाच्या काळात गुडघे टेकण्यापेक्षा संघर्षाने त्याचा मुकाबला करायला हवा! व्हिडीओत एक हरीण उंचच उंच उड्या घेत नदी पार करत असताना दिसून आली. त्याचवेळी एका भुकेल्या मगरीची त्याच्यावर नजर पडते आणि मगर त्याच्या दिशेने आपला मोर्चा वळवते, असे पुढे यात स्पष्ट होते. मुळात हरीण आपल्या पूर्ण वेगाने उड्या घेत त्यातून सुटका करणे अशक्यप्राय होते. पण, तरीही जिद्द न सोडता ती सुटकेसाठी प्रयत्न सुरूच ठेवते.

एका मिनिटाच्या या व्हिडीओत हरीण पाण्यातून मार्ग काढत असताना मगरीने तिचा पूर्ण पिच्छा पुरवल्याचे अधोरेखित होते. एकवेळ तर यात असेच वाटत होते की, आता मगर हरणावर झडप मारणार. पण, हरणाने शेवटपर्यंत प्रयत्न सोडले नाहीत आणि ज्यावेळी ती किनारा गाठून पार झाली, त्यावेळी मगर काहीशी मागे राहिली होती.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतीय वन सेवाधिकारी क्लेमेंट बेन यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला असून एक उडी आयुष्यासाठी, असे त्यात म्हटले आहे. हा व्हिडीओ पोस्ट होताच जवळपास 3 लाख 45 हजार जणांनी तो पाहिला होता आणि 7 हजारांपेक्षा अधिक जणांनी त्याला लाईक्सही दिले होते.

संबंधित बातम्या
Back to top button