खर्‍या भ्रूणासारख्या मॉडेल्सची प्रयोगशाळेत केली निर्मिती | पुढारी

खर्‍या भ्रूणासारख्या मॉडेल्सची प्रयोगशाळेत केली निर्मिती

वॉशिंग्टन : संशोधकांनी आता प्रयोगशाळेत खर्‍या भ्रूणासारखे मॉडेल विकसित केले आहेत. अर्थात हे मॉडेल म्हणजे खर्‍या भ्रूणाची परिपूर्ण प्रतिकृती नाही. खर्‍या भ्रूणाचे हे चौदा दिवसांच्या विकासाचे मॉडेल आहेत. ते मानवी शरीरातील स्टेमसेल्स म्हणजेच मूळपेशींपासून विकसित केलेले आहेत. स्त्रीबीजाचे शुक्राणूने फलन झाल्यानंतरच्या विकासाचे टप्पे दर्शवण्यासाठी ते विकसित केलेले आहेत. विविध आजार, विकृती आणि त्यावरील उपाय याबाबतचे संशोधन करण्यासाठी हे मॉडेल उपयुक्त ठरतील असे संशोधकांना वाटते.

मानवी शरीराच्या विकासाच्या सर्वात प्रारंभीच्या टप्प्यांना दर्शवणारे हे मॉडेल आहेत. त्यावेळी एखादे फलित बीजांड प्रथमच विभाजित होण्यास सुरुवात करते व ते गर्भाशयाच्या भिंतीवर स्थापित होते. जन्मजात विकृतीही याच सुरुवातीच्या काळात विकसित होत असतात. त्यांचा अभ्यास करणे यामुळे शक्य होईल. तसेच या टप्प्यामध्ये अनेक महिलांचा गर्भपातही होत असतो.

त्याची कारणेही शोधता येऊ शकतील. तसेच अशा विकसित होणार्‍या भ्रूणावर औषधांचा कसा परिणाम होतो हे सुद्धा यामधून पाहता येऊ शकेल. इस्रायलमधील विझमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील स्टेमसेल बायोलॉजिस्ट जेकब हना यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Back to top button