ocean temperature : महासागरांच्या तापमानात उच्चांकी वाढ | पुढारी

ocean temperature : महासागरांच्या तापमानात उच्चांकी वाढ

लंडन : महासागरांच्या तापमानात उच्चांकी वाढ झाल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. हवामान बदल, जागतिक तापमानवाढ याचाच हा परिणाम आहे. महासागरांचे तापमान वाढणे हे केवळ सागरी पर्यावरणासाठीच नव्हे तर पृथ्वीसाठीही चिंतेचे कारण ठरू शकते.

जगातील समुद्रांच्या पृष्ठभागाच्या सरासरी दैनंदिन तापमानाने गेल्या आठवड्यात तापमानाचा 2016 मधील विक्रम मोडला. युरोपियन संघाची क्लायमेट चेंज सर्व्हिस असलेल्या ‘कोपरनिकस’ या संस्थेने याबाबतची माहिती दिली आहे. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान 20.96 सेल्सिअस म्हणजेच 69.73 अंश फॅरेनहाईटपर्यंत गेले आहे. ते वर्षातील या काळातील सरासरीपेक्षा कितीतरी अधिक आहे.

हवामानाच्या नियंत्रकांमध्ये महासागरांचाही समावेश होतो. ते उष्णता शोषून घेत असतात. तसेच निम्म्या पृथ्वीच्या ऑक्सिजनची निर्मिती करतात आणि ऋतुचक्राला चालना देतात. महत्त्वाचे म्हणजे महासागरांकडून हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला जात असतो. मात्र, समुद्रांच्या उष्ण पाण्याची असा कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे जगाचे तापमान वाढवणारा हा वायू अधिक प्रमाणात वातावरणात राहू शकतो.

उष्ण महासागर आणि उष्णतेच्या लाटेमुळे मासे, व्हेलसारख्या सागरी जलचरांच्या प्रजातींवर विपरित परिणाम होऊ शकतो. हे जलचर सतत थंड पाण्याच्या शोधात फिरत असतात. त्यामुळे अन्नसाखळीवरही परिणाम होऊ शकतो. मासळीच्या साठ्यावरही याचा विपरित परिणाम होईल असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Back to top button