

लंडन : सध्याचा जमाना रोबो, नॅनो टेक्नॉलॉजी, थ्री-डी प्रिंटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे. यंत्रांकडून अनेक प्रकारची कामे सध्या करवून घेतली जात आहेत. आता इंग्लंडमध्ये एका रोबोटिक श्वानाकडून शीतयुद्धाच्या काळात शस्त्रास्त्रांच्या चाचण्या ज्याठिकाणी घेतल्या जात होत्या अशा दोन ठिकाणांचा सर्व्हे करण्यात आला.
एखादा श्वानासारखा दिसणारा हा रोबो चार पायांचा आणि हवी तशी हालचाल करू शकणारा आहे. हा रोबो तसेच काही ड्रोन्सच्या सहाय्याने सफोकमधील ऑरफोर्ड नेस येथील इमारती व विशिष्ट जागांची पाहणी करण्यात आली. एकेकाळी हे संरक्षित ठिकाण हे लष्करी चाचण्यांसाठी राखीव होते. या प्रयोगशाळा लोकांसाठी तसेच स्टाफसाठीही सुरक्षेच्या कारणावरून बंद ठेवलेल्या आहेत. या रोबोचे 'बाम नट्टल'कडून संचालन केले जाते. तेथील कोलिन एविसन यांनी सांगितले की येथील इमारतींचा आकार आणि रचना यांची माहिती मिळवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. या इमारती अतिशय महत्त्वाच्या आहेत.
त्यांची नोंद कशी ठेवावी हे आम्हाला जाणून घेण्याची इच्छा होती. या इमारती 1960 मध्ये बांधण्यात आल्या होत्या. तिथे दोन ते सहा प्रयोगशाळा असून अणुबॉम्बशी संबंधित काही पर्यावरणाच्या चाचण्या तिथे केल्या जात असत. एखाद्या बॉम्बमुळे किती हादरा बसेल, स्फोटाचे उच्च तापमान किती असेल, किती धक्के बसतील आणि जी फोर्सेस कसे असतील याबाबतच्या चाचण्या तिथे होत असत. याठिकाणी 'स्पॉट' नावाच्या या रोबोटिक श्वानाकडून सर्व्हे घेण्यात आल्या. बोस्टन डायनॅमिक्सकडून हा रोबो विकसित करण्यात आला आहे.