70 वर्षांपासून मशिनमध्येच बंद! | पुढारी

70 वर्षांपासून मशिनमध्येच बंद!

वॉशिंग्टन : एक व्यक्ती तब्बल 70 वर्षांपासून एका मशिनमध्ये बंद आहे. ‘आयर्न लंग’ नावाचे हे मशिन असून त्याची किंमत तब्बल 600 पाऊंड आहे. तर संपूर्ण आयुष्य या मशिनमध्ये घालवणार्‍या व्यक्तीचे नाव पॉल अलेक्झांडर असून त्यांचे वय 77 वर्षे आहे. अलेक्झांडरला ‘पोलिओ पॉल’ या नावानेही ओळखले जाते. पॉल 6 वर्षांचे असताना त्यांना सन 1952 मध्ये पोलिओ झाला होता. पॉल यांच्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्डदेखील आहे. सर्वात जास्त काळ आयर्न लंगमध्ये राहणारा रुग्ण म्हणून त्यांची नोंद गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
1946 साली पॉल यांचा जन्म झाला होता. जन्मानंतरच त्यांना अनेक कठीण समस्यांचा सामना करावा लागला होता.1952 मध्ये अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भीषण पोलिओची साथ पसरली होती. पोलिओचा संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावत होता. त्याकाळी कमीत कमी 58,000 रुग्ण सापडले होते. पीडितांमध्ये सर्वाधिक लहान मुलेच होते. याच काळात पॉल यांना देखील पोलिओ झाला होता. त्यांना लकवा मारला होता. मानेच्या खालच्या शरीराची हालचालही करता येत नव्हती. त्यानंतर श्वास घेण्यासही त्रास होऊ लागला.

अमेरिकेने 1979 साली देश पोलिओ मुक्त झाला असल्याची घोषणा केली. मात्र, तोपर्यंत पॉलला पोलिओने ग्रासले होते. आजारावर मात देण्यासाठी मग शेवटचा पर्याय म्हणून पॉलला आयर्न लंग मशिनमध्ये ठेवण्यात आले. या मशिनचा शोध 1928 मध्ये लावण्यात आला. मशिनचा शोध लावल्यानंतर 60 च्या आसपास हे मशिन बनवणे पुन्हा बंद झाले. दरम्यान, या मशिनचा वापर करणारे पॉल हे एकमेव व्यक्ती आहेत. आता अधिक तंत्रज्ञान विकसित झाले तरीही पॉल यांनी याच मशिनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.

Back to top button