12 लाखांची चहाची किटली!

लंडन : चहाची किटली सध्याच्या जमान्यात दुर्मीळ होत चालली आहे. घराघरातून किटली दिसण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. ब्रिटनमध्ये मात्र चहाची एक ऐतिहासिक किटली लिलावात विकत घेण्यासाठी इतकी स्पर्धा वाढली आहे की, त्याला काही जण अगदी 12 लाखाच्या आसपास किंमत मोजण्यासही तयार आहेत.
डेली मेलने दिलेल्या रिपोर्टनुसार, ब्रिटनच्या एडवर्ड महाराजासाठी ही अतिशय दुर्मीळ आणि प्राचीन किटली तयार करण्यात आली होती. एरवी, चहाची किटली अॅल्यमिनियम किंवा चिनी मातीपासून तयार केली जाते आणि त्याची किंमत हजाराच्या आतच असते. पण, लंडनमधील ही सात इंचाची प्राचीन किटली सर्वात महागडी किटली ठरू शकते. 1876 मध्ये विल्यम जेम्स गूडने ही किटली तयार केली होती. अतिशय मोहक स्वरुपातील असल्याने हे देखील या किटलीचे ठळक वैशिष्ट्य ठरले आहे. या किटलीचा 19 सप्टेंबर रोजी सॅल्सिबरी, विल्टशायर येथे लिलाव होणार आहे.
जगातील सर्वात महागडी किटलीही ब्रिटनमध्येच
व्हिक्टोरियन शैलीतील जगातील सर्वात महागडी किटली ब्रिटनमधील एन सेठीया फाऊंडेशनकडे आहे. 18 कॅरेट सोन्यामधून ही किटली घडवली गेली असून इतके कमी की काय म्हणून ही किटली हिरेजडितही आहे. किटलीच्या मधोमध 6.67 कॅरेटचा रुबी देखील वैशिष्ट्यपूर्ण ठरत आले आहे. गिनिज रेकॉर्डनुसार या किटलीचे हँडल आयव्हरीपासून तयार केले गेले आहे. 2016 मध्ये या किटलीला 24 कोटी 80 लाख इतकी विक्रमी किंमत मिळाली होती.