floating island : दरवर्षी नावेने ढकलावे लागणारे तरंगते बेट! | पुढारी

floating island : दरवर्षी नावेने ढकलावे लागणारे तरंगते बेट!

वॉशिंग्टन : अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यात चिप्पेवा नावाचे एक असे सरोवर आहे, जेथे तरंगते बेट आढळून येते. हे बेट थोडेथोडके नव्हे तर चक्क 40 एकरात पसरले आहे. याचा पृष्ठभाग दलदलीचा आहे आणि यामुळे त्याला चिप्पेवा फ्लोएज फ्लॉटिंग बोग, असेही संबोधले जाते. पण, अतिशय अनोखा असा हा बेट अनेकदा त्रासदायकही ठरतो. कारण, या बेटाला दरवर्षी, नित्यनेमाने नावे एकत्रित आणून मागे ढकलावे लागते!

आता हे बेट मागे का ढकलावे लागते, असा प्रश्न निर्माण होईल. ओडिटी सेंट्रलच्या रिपोर्टनुसार, चिप्पेवा सरोवरावर एक महत्त्वपूर्ण पूल असून हा पूल पूर्व आणि पश्चिम किनार्‍यांना जोडणारा एकमेव मार्ग आहे. मात्र, काही वेळा हा पूल या तरंगत्या बेटामुळे अडवला जातो. यामुळे लोकांचे येणे जाणे कठीण होते. शिवाय, स्थानिक नाव चालकांनाही पुलावर पोहोचणे कठीण बनते. यामुळे त्यांना हे तरंगते बेट मागे ढकलून मार्ग मोकळा करून घ्यावा लागतो.

येथे दरवर्षीच हे बेट मागे ढकलावे लागते, असे स्थानिकांनी यावेळी सांगितले. एरवी हे बेट तरंगते असल्यासारखे दिसत नाही. मात्र, दरवर्षी ते मागे ढकलावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. चिप्पेवा फ्लोएज वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, या बेटावर मोठ्या प्रमाणात झाडे आहेत आणि वारे वाढते, त्यावेळी हे बेटच हलू लागते. नंतर ते हळूहळू आपली जागा सोडून भरकटते. मात्र, वारा थांबला की, बेटही आहे त्या ठिकाणी स्थिरावते आणि यामुळे पुलाच्या मार्गात आल्याने बेटाला मागे ढकलणे अपरिहार्य बनते. गतवर्षी हे बेट मागे ढकलण्यासाठी 25 नावे एकत्रित आणावी लागली होती.

Back to top button