जपानी तरुणाईला नको आहेत मुलं! | पुढारी

जपानी तरुणाईला नको आहेत मुलं!

टोकियो : जपानमध्ये दीर्घायुष्यी लोकांची संख्या मोठीच आहे. ओकिनावासारख्या बेटांवर तर वयाची शंभरी पार केलेले अनेक लोक पाहायला मिळतील. मात्र, जपानमध्ये एकीकडे वृद्धांची संख्या अशी मोठी असताना दुसरीकडे जन्मदरात घट होत चालल्याचे दिसत आहे. तेथील तरुण-तरुणींना मुलांना जन्माला घालण्याची इच्छा नाही. वयाच्या अठराव्या वर्षीच ते आपल्याला मुलं नकोत, असा निर्णय घेऊ लागली आहेत!

जपानमध्ये 18 वर्षे वय असलेलया सुमारे एक तृतियांश तरुणींना आई होण्याची इच्छा नाही, असे एका सरकारी संस्थेने म्हटले आहे. जपान हा अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगात तिसर्‍या क्रमांकावर आहे. मात्र, तेथील घटती लोकसंख्या हा चिंतेचा विषय बनलेला आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन अँड सोशल सिक्युरिटी रिसर्चच्या एका अहवालात असा अंदाज व्यक्त केला आहे की 2005 मध्ये जन्मलेल्या 33.4 टक्के स्त्रिया अपत्यहीन असतील. सर्वात आशादायक स्थितीत ती संख्या 24.6 टक्के आणि सर्वात वाईट स्थितीत 42 टक्के असेल. पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी जूनमध्ये तीन किंवा अधिक मुलं असलेल्या कुटुंबांना मोठ्या पेआऊटसह अभूतपूर्व अशा सुविधा देणार असल्याची घोषणा केली होती. गेल्या चार दशकांहून अधिक काळ जपानमध्ये जन्मदरात घट होत आहे.

Back to top button