‘हनुमान चालिसा’चा पाठ करण्याचा बालकाचा विक्रम

अमृतसर : लहान वयातच आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवणारी अनेक बालके असतात. आता पंजाबच्या भटिंडा येथे राहणार्या पाच वर्षांच्या एका बालकाने असाच विक्रम केला आहे. त्याने एक मिनीट 35 सेकंदात हनुमान चालिसाचा पाठ करून दाखवला. गीतांश गोयल असे या मुलाचे नाव आहे. त्याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलाच जुना विक्रम मोडीत काढला आहे.
2018 मध्ये झारखंडच्या हजारीबाग येथे राहणार्या युवराज या पाच वर्षांच्या मुलाने एक मिनीट 55 सेकंदात हनुमान चालिसाचे पठण केले होते. त्यानंतर त्याचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. चार वर्षांनंतर म्हणजेच 2022 मध्ये युवराजचा हा विक्रम गीतांशने मोडला. अवघ्या एका सेकंदाच्या फरकाने त्याने हा विक्रम केला होता.
त्यावेळी त्याने एक मिनीट आणि 54 सेकंदात हनुमान चालिसाचा पाठ केला होता. आता त्याने स्वतःचाच हा विक्रम मोडला आहे. त्याने आता 1 मिनीट 35 सेकंदात हनुमान चालिसाचे पठण केले. साधारणपणे इतक्या लहान वयात हनुमान चालिसा स्मरणात ठेवणे कठीण मानले जाते. मात्र या मुलाने ती लक्षातच ठेवली असे नव्हे तर अतिशय वेगाने तिचा पाठही करून दाखवला.