मिसिसिपीतील सर्वात लांब मगर | पुढारी

मिसिसिपीतील सर्वात लांब मगर

न्यूयॉर्क : अमेरिकेत काही परवानाधारक शिकार्‍यांना मगरीची शिकार करण्याची पवानगी दिली जात असते. आता अशाच शिकार्‍यांनी मिसिसिपी राज्यातील आतापर्यंत पकडण्यात आलेल्या मगरींपैकी सर्वात लांब मगरीची शिकार केली आहे. राज्यातील याझू नदीत ही मगर होती. 14 फूट 3 इंच लांबीच्या या मगरीचे वजन 802.5 पौंड म्हणजेच 364 किलो आहे. यापूर्वी पकडलेली मगर तिच्यापेक्षा अवघ्या दोन इंचाने कमी लांबीची होती.

मिसिसिपी डिपार्टमेंट ऑफ वाईल्डलाईफ, फिशरीज अँड पार्क्सने याबाबतची माहिती दिली आहे. यापूर्वी सापडलेली मगर नर जातीची होती आणि तिची लांबी 14 फूट 0.75 इंच तसेच वजन 766.5 पौंड म्हणजेच 347 किलो होते. 2017 मध्ये काही शिकार्‍यांनी ती नाटचेझ येथे पकडली होती.

गेल्या शनिवारी शिकार्‍यांनी मिसिसिपीतील दहा दिवसांच्या मगरीच्या शिकारीच्या मोहिमेवेळी आतापर्यंतच्या सर्वात लांब ठरलेल्या व नर जातीच्या या मगरीची शिकार केली. दरवर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात अशी मगरींच्या शिकारीची मोहीम तिथे राबवण्यात येते. या मगरीचा छडा लागल्यावर तिला पकडून ठार करण्यासाठी त्यांना सात तास लागले.

Back to top button